रायबरेली :
उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेलीमधून आमदार असणाऱया अदिती सिंह यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्या काँग्रेसमधील महिला संघटनेच्या महासचिव म्हणून कार्यरत होत्या. पक्षातून त्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना अदिती सिंह म्हणाल्या, पक्षाच्या निर्णयाचा मी आदर करते. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि भाजपमध्ये चाललेल्या राजकीय युद्धादरम्यान ट्विट करून त्यांनी स्वपक्ष असलेल्या काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत अदिती सिंह यांनी पक्षाला नोटीस पाठवत कारवाईबाबत खुलासा मागितला आहे.
स्वपक्षावरील टीकास्त्र
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यादरम्यान चाललेल्या राजकीय युद्धावरून काँग्रेसच्या आमदार आणि गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱया अदिती सिंह यांनी काँग्रेसवरच टीकेची झोड उठविली होती.