प्रतिनिधी/ चिपळूण
पनवेल येथून आलेल्या व जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय महिलेला कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे गुरूवारी रात्री प्रशासनाने जाहीर केले असून हा कोरोनाचा जिल्हय़ातील चौथा बळी ठरला आहे. मृत्यूनंतर तिसऱया दिवशी तिचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहरात अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाल्याने नारदखेरकी या तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला, तथापी प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तात गावातच विधी पार पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गाव आयसोलेट करण्यात आले आहे.
मुंबई-पनवेल येथून 14 मे रोजी कुटुबीयांसोबत ही महिला खासगी वाहनाने नारदखेरकी या आपल्या गावी आली होती. तिला टीबी व आस्थमाचा आजार असून गावी कोरोनासदृश लक्षणे दिसल्याने तिला नातेवाईकांसह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे 19 मे रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त होताच गुरूवारी रात्री कोरोनामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. तिच्यावर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र तेथे झालेल्या विरोधामुळे गावातच अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित करण्यात आले.
नारदखेरकीतील काही ग्रामस्थांनी गावात अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवला. मात्र प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी ठाम भूमिका घेतली. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व खबरदारी घेत पोलीस बंदोबस्तात गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.
गाव आयसोलेट
कोरोनाचा बळी ठरलेली ही महिला पनवेलमधून प्रथम नारदखेरकीत आली होती. त्यामुळे गाव आयसोलेट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या दहा पथकांच्या माध्यमातून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी सांगितले.
कोसबीतील तिघांचे नमुने तपासणीसाठी
दिवा येथून चालत आलेला कोसबीतील 29 वर्षीय तरूण कोरोनाबाधित आढळल्याने त्याची आई व दोन भावांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
आमदार निकमांची भेट
आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी कोसबीला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून याबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.