अरुण केदार यांचे कॅरमचे ऑनलाईन उपक्रम : सेलिब्रेटी, उद्योजकही रमले कॅरम खेळण्यात : नियमांचे पालन करून स्पर्धा घेण्याचा विचार : अरुण केदार, बाळासाहेब गोसावी यांची माहिती
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
संपूर्ण जग कोरोनाने ग्रासले असताना कॅरम या खेळाने मात्र बहुतांश सर्वांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या उद्योजक ते सेलिब्रेटी मंडळींनी विरंगुळा व टाईमपास म्हणून ज्या खेळाकडे पाहिले जाते, तो कॅरम आज सर्वांच्या मदतीला आल्याचे चित्र आहे. याच संधीचा उपयोग करून कॅरमसाठी देशात महत्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे खजिनदार अरुण केदार यांनी नवीन ऑनलाईन संधी उपलब्ध करून कॅरमसाठी नवनवीन उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविले. कॅरम संबंधित या विविध उपक्रमांना देशातील कॅरम खेळाडू, प्रेक्षकांनी मोठय़ा प्रमाणात दाद दिल्याची माहिती अरुण केदार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
केंद्रीयमंत्री रामदास आठवले, माजी राज्यमंत्री सचिन अहिर अशा विविध राजकारण्यांनी वेळ घालविण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत कॅरमचा उपयोग केला आहे. सिनेतारका शिल्पा शेट्टी, अभिनेते अनिल कपूर, प्रथमेश परब, प्राजक्ता माळी आदी सेलिब्रिटीही कॅरम खेळतानाचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आपल्या गावी भावासोबत कॅरमचे दोन हात करत असून एरव्ही व्यस्त असणारे ऑलिंपिक खेळाडू अर्जुन पुरस्कारार्थी धनराज पिल्ले कॅरमचा व्हीडिओ बघून आपला वेळ घालवित आहेत.
कॅरमचे विविध व्हीडिओ व्हायरल
अरुण केदार म्हणाले, गेल्या काही दिवसांत माझ्याकडे कॅरमच्या अनेक व्हीडिओ क्लिप येत असून त्यात एरव्ही कॅरम स्पर्धांत कधी न दिसणारी मंडळी ग्राफिक्सचा आधार घेऊन अविश्वसनीय शॉट खेळताना दिसत आहेत. अगदी सिनेमात गाडय़ा उडवताना आपण पाहतो, त्याप्रमाणे सोंगटय़ा उडवून घेतानाचे ते डोळे बंद करून विविध शॉट खेळतानाचे व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहेत. त्यामुळे कॅरमचा प्रसार होत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवत कॅरम खेळताना व्हीडिओ असेल किंवा अंगणात कॅरमची चौकट आखून चक्क माणसेच सोंगटी व स्ट्रायकरचे काम करतानाचा गमतीदार व्हीडिओ खूप व्हायरल झाला आहे. या कालावधीत कॅरमच्या मागणीतही कमालीची वाढ झाली असून येणाऱया काळात अशा अडचणींवेळी कॅरमच्या साथीला येतो. हे लक्षात घेता, भविष्यात सर्व घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात कॅरमचा शिरकाव होणार असल्याचे शुभसंकेत रसिकांसाठी आहेत. संचारबंदीमुळे कॅरम सर्वत्र फॉर्मात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जगभर त्यांचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. जगभरात सुमारे वीस देशात कॅरम अधिकृत स्पर्धात्मक पातळीवर खेळला जात असून लॉकडाऊनमुळे अधिक देशात कॅरमचा फैलाव होण्यास मदत होणार आहे.
ऑलिंपिकपर्यंत कॅरम जाण्याचे शुभसंकेत..
येत्या काळात कॅरम ऑलिंपिकमध्ये घेण्याची स्वप्ने पाहणाऱया मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काळाची गरज लक्षात घेता, विविध खेळांच्या संघटना आपापला खेळ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खेळाचा प्रचार करण्याच्या हेतूने ऑनलाईन उपक्रम राबवित आहेत. यात अरुण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कॅरम असोसिएशन या मालिकेद्वारे कॅरममधील विविध माहिती व रेकॉर्ड असोसिएशन व कॅरम रसिकांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचवित आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूटय़ुब चॅनेलवर असलेले 1500 पेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्हीडिओ रसिकांसाठी मेजवानीच ठरत आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट सामन्यांचे व्हीडिओ व कॅरम या खेळातील माहिती सोशल मीडियाद्वारे कॅरम रसिकांपर्यंत पाठविण्याची मालिका असोसिएशनद्वारे करण्यात येत आहे. अखिल भारतीय कॅरम फेडरेशनने ही 9 आणि 10 मे रोजी काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे सराव सामने फेसबूक लाईव्ह करून रसिकांना खूष केले होते. 50 मिनिटांच्या खेळात पाच महिला व पाच पुरुष खेळाडूंनी 11 व्हाईट स्लॅमची नोंद केली. त्यात सर्वाधिक तीन स्लॅमची नोंद विश्वविजेत्या प्रशांत मोरे यांनी केली, तर संदीप दिवे व विकास धरिया यांनी प्रत्येकी दोन व्हाईट स्लॅम केले. माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीने एक, तर महिला विश्वविजेत्या रश्मी कुमारी, आयेशा साजिद खोका वाला व देबजानी तामुलींनी प्रत्येकी एक व्हाईट स्लॅमची नोंद केली.
नियमांचे पालन करत कॅरम स्पर्धा घेणार!
कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. तरीही शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत सर्व परिस्थिती रुळावर आल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पुन्हा नव्या जोमाने कॅरम भरारी घेईल, असा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा प्रयत्न राहील. स्पर्धेच्या हॉलमध्ये केवळ खेळणारा खेळाडू आणि पंचांना प्रवेश द्यावे व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युटय़ूब चॅनेल व फेसबूकद्वारे कॅरम रसिकांसाठी सामने दाखविण्याचा विचार सध्या सुरू असून यंदाची वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्मयपद कॅरम स्पर्धा महाराष्ट्रात करण्याबाबत विविध ठिकाणी चाचपणी सुरू आहे. सर्व कॅरम खेळाडू पदाधिकारी कॅरम रसिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे आणि कोरोनाला देशातून दूर करावे, असे आवाहन अरुण केदार व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय कॅरम महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी केले आहे.