दापोली / प्रतिनिधी
दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बऱ्या झालेल्या आणखीन दोन रुग्णांना मंगळवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आमदार योगेश कदम देखील आवर्जून उपस्थित होते. यामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारे व कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. याबद्दल आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
दापोलीत विविध मार्गांनी दाखल झालेल्या चाकरमान्यांपैकी 23 जणांना कोरोनाची लागण झालेली होती. यापैकी 17 जणांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी सात जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन देखील करण्यात आले. त्याच प्रमाणे रुखी कोंढे येथील आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल होते. त्यांनादेखील तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दहा दिवस या रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. दहा दिवसांनी यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. यामुळे ते कोरोनाचा आता प्रसार करू शकणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांना आरोग्य विभागाने आज उपजिल्हा रुग्णालयाच्या गाडीतून घरी पाठवले.
यावेळी दोन्ही रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. शिवाय कोणती पथ्य पाळायची हे देखील एक कागद या रुग्णांना देण्यात आला. यावेळी दापोलीचे आमदार योगेश कदम आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील यावेळी बोलताना केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. शिवदास चव्हाण, डॉ. शिवा बिरादार, डी. डी. जाधव, डॉ. रामतीर्थ चौगुले, डॉ. कुणाल मेहता, डॉ. प्रदीप बनसोडे, डॉ उर्मिला नष्टे, डॉ. सानिया बुटाला, डॉ. काव्या शेटे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी यावेळी सर्वांनी टाळ्यांचा गजर करून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे अभिनंदन केले व त्यांचे मनोधैर्य वाढविले.