ऑनलाईन टीम / बीड :
भाजपचे दिगवंत नेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आज एक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आणि कार्यकर्त्यांना कोरोना संकट आणि लाॅक डाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
त्या म्हणल्या, 3 जून रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होणार आहे. पण गडावर कोणीही गर्दी करू नये, कारण हा कार्यक्रम सर्वांसाठी लाईव्ह असणार आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच या दिवशी गडावर कोणीही गर्दी करू नका, सर्वांनी घरीच थांबा. साहेबांच्या आवडीचे पदार्थ करा, तो काय आहे हे मी सांगायची गरज नाही. दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क आणि औषधांचे वाटप करा. त्यांचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
पुढे आपल्या पोस्ट मध्ये त्या म्हणल्या, ‘3 जून’ तसं मी या दिवसाची वाट अजिबात पहात नाही !! अगदी 2 जून 2014 ला जाऊन जग थांबावं असं वाटतं. मनात आनंद, उत्साह, समाधान होतं 2 जून ला…. बाबा पोटभर रसपोळी खाऊन गेले होते… शाहू म्हणाला, आज साहेबांनी भरपूर आमरस खाल्ला. ‘खाऊ दे रे शाहू’, असं त्याला तेच म्हणाले… तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी.. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही… म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असं वाटतं., असे पंकजा यांनी म्हटले आहे.