ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत (WHO) मोठे विधान केले आहे. आजपासून आपण WHO सोबत असलेले संबंध कायम संपवत आहोत, अशी मोठी घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची असलेले संबंध संपवण्याची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, दरवर्षी केवळ चार कोटी डॉलर एवढी रक्कम मदत म्हणून देणाऱ्या चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. अमेरिका या संघटनेला दरवर्षी 45 कोटी डॉलर मदत करते. जागतिक आरोग्य संघटना योग्य त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली आहे त्यामुळे आजपासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेची असलेले संबंध तोडत आहोत अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.
जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुलं आहे, असे ही ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीवरून याआधीही ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले होते. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार आहे, असे ही त्यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधीही थांबवण्यात येणार आहे. याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी हा आता जागतिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य संघटनांना दिला जाईल.
यावेळी पुन्हा एकदा ट्रम्प यांनी या व्हायरसला वुहान व्हायरस असे संबोधले. चीनने वुहान व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो जगभरात पसरला. या व्हायरसमुळेच अमेरिकेतील एक लोक पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर जगभरात ही लाखो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे असे ट्रम्प यांनी यावेळी म्हटले.