ताळगांव येथे पंचायत गृह आवश्यक सरपंच आग्नेल डीकुन्हा यांचे मत ताळगांवतील शेतजमीन प्रास्तावित पंचायत गृह प्रकल्प वादाच्या भोवऱयात, सात समाजसेवकांना अटक
प्रतिनिधी / ताळगांव
ताळगाव येथील शेतजमीन प्रस्तावित पंचायत गृहासाठी वापरण्यात येत असल्यामुळे वादाच्या भोवऱयात अडकली असून सरपंच, पंचसदस्य आणि विरोधकांमध्ये खडाजंगी दिसून येत आहे. एकाबाजूने नागरिकांना विश्वासात न घेता ही जमीन पंचायत गृहासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत तर ताळगाव पंचायतचे सरपंच हा प्रकल्प संपूर्ण प्रक्रियेनिशी करण्यात येत असल्याचा दावा करत आहेत.
प्रस्तावित ताळगाव पंचायत गृह हा प्रकल्प संपूर्ण प्रक्रियेनिशी करण्यात येत असून याविषयी विरोधकांनी केलेले सर्व आरोप हे राजकीय आणि बिनबुडाचे आहेत. ताळगाववासियांच्या भल्यासाठी पंचायत झटत असून विविध साधनसुविधा या पंचायत गृहाद्वारे लोकांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती ताळगाव पंचायतीचे सरपंच आग्नेल डीकुन्हा यांनी ताळगाव येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सुरुवातीला जेव्हा 2004 मध्ये जानु रोझारीयो सरपंच होते, तेव्हापासून या प्रकल्पाच्या तयारीला आम्ही लागलो होतो, कारण एका लहानशा खोलीत पंचायत चालत होती. आता देखील ज्या जागेत पंचायत आहे. तो कॉम्युनिटी हॉलचा बेजमेंट आहे. त्यामुळे या पंचायत गृहची आम्हाला व ताळगाव वासीयांना अत्यंत गरज आहे. सध्या ज्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे त्या जागेची कायदेशीर कागदपत्रे आमच्या कडे आहे. तसेच ज्यांची ही जमीन आहे त्यांना देखील 4 लाख रुपये त्यावेळी देण्यात आले होते. असे आग्नेल डीकुन्हा यांनी यावेळी सांगितले.
आता जे विरोधक करत आहे हे राजकारण आहे. त्यांना आम्ही केलेला विकास पाहवत नाही आहे. ज्या लोकांनी शनिवारी सकाळी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये या जागेचे मूळ शेतकरी कोणीच नव्हते, तसेच जे आले होते त्यांना बळजबरीने घरातून आणण्यात आले होते. असा आरोप देखील डीकुन्हा यांनी यावेळी केला.
या पंचायत गृह प्रकल्पाची जागा 6 हजार 165 चौरस जागेमध्ये बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे एक चांगले पंचायत घर ताळगांववासीयांसाठी अस्तित्वात येणार आहे. यामध्ये वाचनालय, आरोग्य सेवा, पोस्ट ऑफिस, सभागृह, यासारखे अनेक व्यवस्था असणार आहे. असेही आग्नेल यांनी यावेळी पत्रकार परीषदेत सांगितले.
या पत्रकार परीषदेला सरपंच आग्नेल डीकुन्हा यांच्यासोबत उपसरपंच रेघा पै, पंचायत सचिव पीटर मार्टीन्स, माजी सरपंच जानु रोझारीयो, व इतर पंचायत सदस्य उपस्थित होते.