संकट कोरोनाचे यूएईहून सांगताहेत बिबवणेचे संदीप राऊळगावकर
पत्नी व मुलासह आहे वास्तव्य : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरकारकडून कडक पावले
रुग्णांची संख्या वाढती प्रभावी उपाययोजना
पद्माकर वालावलकर / कुडाळ:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगामध्ये झपाटय़ाने होत आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी युनायटेड अरब एमिरेटस (यूएई) सरकारने कडक पावले उचलली. येथे कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र, सरकार प्रभावीपणे उपाययोजना राबवित आहे. प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलवर रोज सायंकाळी 7.30 वाजता पोलीस सायरन वाजतो. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद झाल्याचा एकप्रकारे संदेश समजला जातो. नंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मासे विक्रेत्यांचा निगेटिव्ह अहवाल आला, तर त्याला मासेविक्रीची परवानगी आहे, असे मूळ कुडाळ तालुक्यातील बिबवणे-राऊळवाडी येथील सुपुत्र व सध्या युनायटेड अरब एमिरेटस देशात वास्तव्यास असलेले संदीप शरद राऊळगावकर यांनी सांगितले.
अभियंता असलेले राऊळगावकर त्या देशात 1999 पासून वास्तव्यास असून रिफायनरी प्लान्टमध्ये (तेल कंपनी) ते नोकरीला आहेत. त्यांची पत्नी डॉ. विनिता व त्यांचा मुलगा विराज त्यांच्यासोबत आहे. तेथील अबूधाबी येथे ते राहतात. कोरोनामुळे तेथे असलेली वास्तव परिस्थिती सांगताना त्यांनी सरकारकडून उपाययोजनांबाबतची अंमलबजावणी स्पष्ट केली.
कोरोनापासून बचावासाठी शिकस्तीने प्रयत्न
सर्व देश कोरोनापासून बचाव करण्याचा शिकस्तीने प्रयत्न करीत आहेत. या देशाच्या सरकारनेही सुरुवातीपासूनच तत्परतेने दखल घेतली. या देशात 29 जानेवारी रोजी पहिल्या रुग्णाची नोंद झाली. ती 73 वर्षीय महिला चीन देशाची होती. सरकारने कडक धोरण अवलंबिले. परंतु तेव्हापासून कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. सध्या 26 हजार 898 वर ही संख्या गेली आहे. त्यातील 13 हजार 906 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले, तर 12 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 237 जणांचा मृत्यू झाला, असे राऊळगावकर म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू
सरकारने मार्च अखेरपासून शाळा, कॉलेज तसेच चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, मॉल्स, क्लब बंद करण्याचे आदेश दिले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली व अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली.
नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
मॉल्समध्ये भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जाताना ग्राहकांवर जंतूनाशक स्प्रे मारुन त्याला आत प्रवेश दिला जाता. तेथे त्याला हँडग्लोव्हज देतात. सॅनिटायझर ठेवलेले आहे. दोन-दोन मीटर अंतरावर स्टीकर लावले आहेत. सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळले जावे, यासाठी नेथे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. त्याशिवाय सीसीटीव्ही कॅमेराद्वारे लक्ष वेधले जाते. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नागरिक कसोशीने पालन करीत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
रोज निर्जंतुकीकरण
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोज सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवर निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जाते. त्यासाठी सरकारने चार ठेकेदार नेमले आहेत. ही मोहीम सुरू असताना नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी आहे. तेल कंपन्या मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांचेही या लढय़ात मोठे योगदान आहे.
मासे विक्री अलिकडे सुरू
सुरुवातीला दोन महिने मासे मिळत नव्हते. अलिकडे मासे विक्री सुरू झाली आहे. मासे विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल, तर मासे विक्रीला त्याला परवानगी दिली जाते. येथे कत्तलखाने सुरू करण्यास अजून परवानगी नाहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्याची परवानगी नाही. तेथून फक्त पार्सल सेवा सुरू आहे.
ऑनलाईन कोर्सेस, योगाचे प्रशिक्षण
नागरिकांना आवश्यक कामशिवाय घरातून बाहेर पडता येत नाहे. भीतीचे वातावरण कमी व्हावे, यासाठी ऑनलाईन कोर्सेस, योगाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. दैनंदिनी कशी असली पाहिजे, याचे मार्गदर्शन केले जाते, असे त्यांनी सांगितले.
..तर 14 दिवस घरी बसावे लागते
रिफायनरी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचा सल्ला दिला आहे. हा प्लान्ट 24 तास सुरू असतो. जे प्लान्ट चालवितात त्यांना रोज डय़ूटी असते. आमच्यासारखे अभियंता आहेत. त्यांना ऑन कॉल डय़ूटी आहे. एखादी समस्या आली, तर तेथून कॉल येतो. प्लान्टमध्ये जाताना वैद्यकीय तपासणी केली जाते. कोरोनाची लक्षणे आढळली तर 14 दिवस घरी बसावे लागते.
भारतीयांना कोरोनाशी लढण्याची ताकद मिळो!
भारतातील सर्व प्रियजनांशी सतत संपर्क ठेवून आहोत. तेथील हालहवाल घेत आहोत. सरकार चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. डॉक्टर्स-नर्सेसनी या लढय़ात वाहून घेतले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल सलाम करावा लागेल. कोरोनाशी लढा देण्याची भारतीय बंधू-भगिनींना ताकद मिळो. आम्ही काळजी घेत आहोत. तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या, असे आवाहन राऊळगावकर यांनी केले.