प्रतिनिधी / मडगाव
मांगूरहिल-वास्को येथील एक बिगर गोमंतकीय मासे विक्रेता व त्याची पत्नी कोरोनाचा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. काल सोमवारी त्यांना मडगावच्या कोविड-19 हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंद्रप्रदेश येथून आलेले मासे वास्कोतील या विक्रेत्यांने खरेदी केले होते अशी माहिती हाती आली आहे.
डॉक्टर देखील ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह
मांगूरहिल-वास्को येथील मासे विक्रेता व त्याच्या पत्नीने अगोदर वास्कोतील एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने डॉक्टर देखील ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्याची संख्या चार झाली होती.
पोलीसही ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह
कोलवा येथील पोलीस स्थानकावरील एका पोलीस कॉन्स्टेबलचे वडिल तसेच त्याचे अन्य दोन साथिदार ट्रृनेट चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आल्याने काल पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. हा पोलीस कॉन्स्टेबल मांगूरहिल-वास्को येथील रहिवाशी असून तो मासे विक्रेत्याचा मुलगा आहे. ट्रनाट चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्याची स्वाब चाचणी गोमेकॉच्या व्हायरलॉजी लॅबमध्ये चालू होती. त्याचा अहवाल आल्यानंतरच ते कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोलवा पोलिसस्थानकातील कॉन्स्टेबल
कोलवा पोलीस स्थानकावरील कॉन्स्टेबलच्या संपर्कात जेवढे पोलीस कर्मचारी आले होते, त्या सर्वाची चाचणी घेण्याचे काम सुरू झाले होते. तसेच संपूर्ण कोलवा पोलीस स्थानकाचे सॅनिटायझेशन करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वास्कोतील मासे विक्रेत्याला ट्रेव्हल हिस्ट्री नव्हती. मात्र, त्याचे नातेवाईक कर्नाटकातून काणकोण मार्गे गोव्यात आल्याचे सरकारी यंत्रणेने म्हटले आहे. मात्र, उलपब्ध माहितीप्रमाणे, आंद्रप्रदेशातून आलेले मासे या विक्रेत्याने खरेदी केले होते व त्यातूनच त्याला कोरोनाची बाधा झालेली आहे. या मासेवाहू वाहनाची पोळे चेकनाक्यावर तपासणी झाली होती का? असा सवाल आत्ता उपस्थित झालेला आहे. या मासे विक्रेत्याने किती जणांना मासे विकले व त्याच्या संपर्कात कोण-कोण आले होते. याचा तपास आता सरकारी यंत्रणेला करावा लागणार आहे. त्याचबरोबर ट्रूनेट चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या डॉक्टराकडे किती लोकांनी तपासणी केली होती. याचा तपास करावा लागणार आहे.