सडोली खालसा वार्ताहर
वार्ताहर / सडोली खालसा
आरे (ता. करवीर) येथे गेल्यावर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर करवीर तहसीलदार शितल मुळे – भामरे यांनी भेट देऊन पूर परिस्थिती संदर्भात केलेल्या पूर्वतयारीचा आढावा बैठक घेतली.
मागील वर्षीऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामध्ये आरे गावाला मोठा फटका बसला होता. गावच्या एका बाजूने वाहणारी तुळशी नदी व दुसर्या बाजूने वाहणारी भोगावती नदी या दोन्हींच्या पाण्याने महापुराचा वेढा दिल्याने बरेच दिवस गावाचा संपर्क तुटला होता. गावातील जवळपास ३३० कुटुंबांना गावातील उंचवट्यावर असलेल्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली होते. लोकांची घरे पडली तसेच काही घरांच्या भिंती पडल्यामुळे घरातील भांडी, कपडे, धान्य वाहून गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
या सगळ्या अनुभवाचा विचार करून या वर्षीचा पुराचा संभाव्य धोका ओळखत कुटुंबांना स्थलांतर करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढून महापूरसदृश्य परिस्थिती येण्यापूर्वीच या कुटुंबांनी स्थलांतरित व्हावे तसेच
गावातील शाळा, समाज मंदिरे, खासगी रिकाम्या इमारती या ठिकाणी या स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची सोय ग्रामप्रशासनामार्फत करावी अशा सूचना तहसीलदार यांनी दिल्या…
या बैठकीस करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, मंडल अधिकारी प्रवीण माने,सरपंच साक्षी कुंभार, उपसरपंच मनीषा खराडे, तलाठी नरेंद्र झुंबड,आरोग्य सेवक प्रतीक कुमठेकर, ग्रामसेवक दिपा यादव, कृषी सहाय्यक सतीश वर्मा व ग्रामस्थ उपस्थित होते.