बलुचिस्तानातील प्रकार : सौदी अरेबियाने संचारबंदी हटविली : जगभरात 89.41 लाख कोरोनाबाधित
कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 4 लाख 67 हजार 156 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर बाधितांचे प्रमाण 89 लाख 41 हजार 198 वर पोहोचले आहे. याचबरोबर आतापर्यंत 47 लाख 54 हजार 477 जणांना कोरोना संसर्गापासून मुक्तता मिळविली आहे. सौदी अरेबियात संचारबंदी हटविण्यात आली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि धार्मिकस्थळांवरील बंदी कायम राहणार आहे. बलुचिस्तानात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे ब्रिगेडियर हसन अफजल यांचा महामारीमुळे मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानात योग्य उपचाराअभावी त्यांचा बळी गेला आहे. बलुचिस्तानात आतापर्यंत 9 हजारांपेक्षा अधिक जणांना संसर्गाची लागण झाली आहे.
न्यूझीलंड : 2 नवे रुग्ण
न्यूझीलंडमध्ये रविवारी 2 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा 1,161 झाला आहे. मागील आठवडय़ात 24 दिवसांनी 5 रुग्ण आढळून आले होते. रविवारी 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून तो अलिकडेच भारतातून परतला होता. तर 15 रोजी दिल्लीहून ऑकलंड येथे पोहोचलेल्या 59 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे.
ब्राझील : 5 टक्के मृत्यूदर
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 1 हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बळींचा आकडा आता 50,058 वर पोहोचला आहे. दिवसभरात 34 हजार 666 नवे रुग्ण सापडले आहेत. ब्राझीलमधील बाधितांचे प्रमाण आता 10 लाख 70 हजार 139 झाले आहे. देशात महामारीतून बरे झालेल्यांचा आकडा 5.20 लाखावर पोहोचला आहे. कोरोना संसर्गाचा देशातील मृत्यूदर 5 टक्के आहे.
सौदी : निर्बंध शिथिल
सौदी अरेबियात रविवार सकाळपासून संचारबंदी हटविली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे. 21 जूनपासून देशातील स्थिती सुरळीत होणार असून आर्थिक घडामोडींना वेग येणार आहे. परंतु सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि धार्मिकस्थळे पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.
फ्रान्स : 600 नवे रुग्ण
फ्रान्समध्ये 24 तासांत 600 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर बाधितांचे प्रमाण वाढून 1,60,093 वर पोहोचले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार बळींचे प्रमाण 29 हजार 633 झाले आहे. फ्रान्समध्येही आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
बीजिंगमध्ये 22 बाधित
चीनची राजधानी बीजिंगमध्ये संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात शहरात 22 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. याचबरोबर 3 संशयास्पद तर 3 लक्षणेरहित रुग्ण आढळून आले आहेत. बीजिंगमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83,378 रुग्ण आढळले असून 4,634 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे.
जर्मनीत संकट कायम
जर्मनीत 687 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 1,91,216 वर पोहोचली आहे. तर बळींचा आकडा 8,961 झाला आहे. जर्मनीत प्रारंभिक टप्प्यात कोरोना विषाणूवर अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत या संसर्गावर चांगले नियंत्रण प्राप्त झाले होते. तसेच तेथील कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही अन्य देशांच्या तुलनेत कमी राखण्यास यश आले आहे.
डेन्मार्क : श्वानाला बाधा
डेन्मार्कमध्ये श्वानाला कोरोनाची लागण झाली आहे. नॉर्थ जुटलँड फार्मच्या मालकाच्या पाळीव श्वानाला संसर्गाची बाधा झाली आहे. या फार्ममधील 46 मिंक प्राण्यांच्या समुहातून प्राप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये दोन मिंक बाधित आढळून आले आहेत. तत्पूर्वी एका फार्ममध्ये 11,000 मिंकांच्या कळपात संसर्ग आढळून आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मारून टाकण्यात आले होते.
चिली : 4,295 बळी
चिलीमध्ये कोरोना विषाणूची बाधा 2 लाख 36 हजार 748 जणांना झाली आहे. तर आतापर्यंत 4,295 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार 24 तासांत 5,355 नवे रुग्ण सापडले असून 202 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात सद्यकाळात 1,682 कोरोनाबाधित व्हेंटिलेटरवर आहेत. यातील 416 जणांची प्रकृती नाजूक आहे.