प्रतिनिधी/ रत्नागिरी :
कोरोना लॉकडाऊनचा कोकणातल्या गणेशचित्र शाळांनाही याचा फटका बसला आहे. सध्या गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सर्व नियम, अटी पाळून काम सुरू आहे. मात्र सुरुवातीला मातीचा तुटवडा मूर्तीकारांना जाणवला, तसेच सध्या कामगारांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यात यावर्षी गणेशमूर्तींच्या उंचीवर शासनाने निर्बंध आणले आहेत. मात्र आर्थिक चणचण आणि चाकरमान्यांची या सणासाठी येण्याची अनिश्चितता यामुळे यावर्षी छोटय़ा मूर्तींनाच मागणी असल्याचं मूर्तीकारांमधून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. गेले काही दिवस काही ठिकाणी या लॉकडाऊनमध्ये शिथिलताही देण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. त्यात गणेशमूर्ती घडवणाऱया चित्रशाळांनाही या संकटाला समोर जावे लागत आहे. कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे. कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एक प्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झाला आहे. त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ असे की घराघरातून पुजल्या जाणाऱया गौरी-गणपतींचा थाट मात्र सार्वजनिक उत्सवांसारखाच असतो. त्यामुळेच कामानिमित्त देशाच्या कोपऱयात असणारा कोकणी माणूस या सणासाठी मात्र आपल्या कोकणातल्या गावी हमखास येतोच येतो. यावर्षी मात्र या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळेच मूर्ती शाळांमधली लगबग कमी असल्याचं पहायला मिळत आहे. काही मूर्तीशाळांमध्ये वर्षभर मूर्ती काढण्याचं काम सुरू असतं. तर काही मूर्तीकार 5 ते 6 महिने अगोदर मूर्तीकामांना सुरुवात करतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्तीकारांना बसला आहे. कच्चा माल उशिराने आम्हाला मिळू लागला. त्यामुळे मूर्तीकामाला उशिरा सुरुवात झाली.
कोरोनामुळे गावाकडे आलेल्या मंडळींपुढेच पैशाची समस्या उद्भवली आहे. तसेच काही मुंबईत मंडळी अडकली आहेत. त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनची भीती असल्याने अनेकांनी गणपतीसाठी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे. पैशाची तर चणचण आहेच. त्यामुळे कित्येकांनी गावाकडच्या नातेवाईकांना यावर्षी कमी उंचीचा गणपती आणून उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळेच दरवर्षी 5 ते 6 फूट उंचीची मूर्ती आणणाऱयांनी यावर्षी 2 ते 3 फूट उंचीच्या मूर्तीची मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे एकूणच कोरोनाचा फटका जसा गणेशमूर्तीकारांना बसला आहे, तसाच गणेशोत्सव साजरा करण्यावरही या कोरोनाचं सावट असल्याचं चित्र आहे.
मूर्तीशाळेत नियम व अटी पाळून मूर्तीकाम
कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी मूर्तीशाळेतील कामावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यावेळी मर्यादित मूर्ती कामाला प्राधान्य दिले जात आहे. सध्या मूर्तीशाळेत सर्व नियम व अटी पाळून मूर्तीकाम सुरू आहे. मास्क लावून मूर्तीशाळेत यावे आणि आल्यावर हाताला सॅनिटाईझर लावावे, अशा सूचना दिल्या जात आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याने तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून गणेशमूर्तीच्या उंचीवर निर्बंध आले आहेत. मात्र असं असलं तरी यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भाविकांकडूनच छोटय़ा मूर्तींनाच मागणी असल्याचे शहरानजीकच्या नाचणे गोडावून स्टॉप येथील मूर्तीकार प्रदीप बाणे यांनी सांगितले.