शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत : व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी : मालवण नगर परिषद सत्ताधारी-प्रशासन वाद
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहरातील पथदीप समस्या दिवसेंदिवस पुन्हा गंभीर रुप धारण करीत असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने सत्तेत येण्यापूर्वी शहरातील पथदीपांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी आणून मोठी बॅनरबाजी करीत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तब्बल एक वर्ष एलईडी बसविण्यावरून सत्ताधाऱयांमध्येच दुफळी निर्माण झाली होती. अखेर शहरात सर्वत्र एलईडी बसविण्यात आले. मात्र, ठेकेदाराने पालिकेने घातलेली कोणतीही बंधने न पाळता पळ काढला. नंतर शासनानेच एक एजन्सी नियुक्त करीत पथदीपांची कामे सोपविली. आता तरी मालवणातील पथदीप समस्या कायमस्वरुपी सुटेल, असे वाटत असताना त्याही एजन्सीकडून पालिका प्रशासनाला ठेंगा दाखविण्याचे काम होत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे गटनेते गणेश कुशे यांनी तत्कालीन मुख्याधिकाऱयांना पत्र लिहून पालिकेतील विद्युत विभागाच्या गलथान कारभारात आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आम्हाला आमच्या पद्धतीने संबंधितांना धडा शिकवावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यावेळी काही प्रमाणात स्ट्रीटलाईटच्या दुरुस्त्या झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा पावसाळय़ात शहरातील अनेक भागातील स्ट्रीटलाईट पूर्णपणे बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे
जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागतेय लोकप्रतिनिधींना!
मालवण नगरपरिषद हद्दीतील पथदीपांसंदर्भात वारंवार सर्वच सदस्यांकडून सर्वसाधारण सभेत तक्रारी होत असतात. परंतु, त्या सभांमध्ये विद्युत विभागातील संबंधित अधिकारी थातूर-मातूर उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचे काम करीत आहेत. प्रत्यक्षात कारवाई काहीच नाही. त्यामुळे सातत्याने लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे, याचे सोयर-सुतक संबंधित अधिकाऱयांना नाही. ज्या कंपन्यांशी नगरपरिषदेचा करार झालेला आहे, त्यांना पाठिशी घालण्याचे काम संबंधित अधिकारी करीत आहेत. याविषयी संबंधित अधिकाऱयांवर कडक कारवाई करून पथदीपांविषयी कायमस्वरुपी तोडगा तात्काळ न निघाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आम्हाला आमच्या पद्धतीने संबंधितांना धडा शिकवावा लागेल, असेही कुशे यांनी स्पष्ट केले होते. आजच्या परिस्थतीत पालिकेतील स्ट्रीटलाईट प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षही विद्युत विभागावर नाराज
पालिकेतील विद्युत विभागावर व त्यात कार्यरत असणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या सभांमध्ये अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रसंगी मला कोणाला घरी बसवायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे. विद्युत विभागाला शहरातील सीएफएल बल्बची यादी, एलईडीची यादी सभागृहात सादर करण्याचे अनेकदा निर्देश देऊन एकाही सभेसमोर अद्याप यादी आलेली नाही. त्यामुळे शहरात बसविलेले सीएफएल बल्बांचे काय झाले? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. एलईडीचे दुखणे संपणार कधी? हेही न समजणारे आहे.