प्रतिनिधी / रत्नागिरी, खेड :
गुरूवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये जिल्हय़ात 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रूग्ण लोटे येथील घरडा कंपनीशी संबंधीत आहेत. यामुळे एकूण बाधीतांची संख्या 1070 झाली आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱया तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या 37 झाली आहे.
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱया खेड तालुक्यातील फुरूस-काताळवाडी येथील 68 वर्षीय वृद्धाचा गुरूवारी सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या 4 झाली आहे. हा वृद्ध महिन्याभरापूर्वी दहिसर-मुंबई येथून गावी आला होता. 9 जुलै रोजी ताप आल्यानंतर एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यास शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 13 जुलै रोजी 108 रूग्णवाहिकेने रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल झाले. 15 जुलै रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गुरूवारी सकाळी त्याचे निधन झाले.
रत्नागिरी शहरातील दोघांचा मृत्यू
रत्नागिरी शहारातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. घुडेवठार, रत्नागिरी येथील 56 वर्षीय रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. कोरोना पॉझीटीव्ह असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत रूग्ण मिरजोळे, एमआयडीसी येथील आहे. या 65 रूग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
10 जण कोरोनामुक्त
गुरूवारी 10 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 665 झाली आहे. गुरूवारी घरी सोडलेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 9 आणि समाजकल्याण रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. गुरूवारी सापडलेले 21 पॉझीटीव्ह रूग्ण घरडा केमीकलचे कर्मचारी आहे. त्यामुळे घरडातील रूग्णांची संख्या 81 झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
291 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 056 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1070 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 11 हजार 704 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 291 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.