प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाचे काम न करण्यासंदर्भात नुकतीच अंगणवाडी कृती समितीची मंत्रालयात महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आयुक्तांसमवेत बैठक झाली. यात कोरोनाचे काम न करण्याबाबत चर्चा होऊन त्यास ठाकूर या सहमत झाल्या. मात्र अंगणवाडय़ा न उघडता नियमित कामे करण्याचे या बैठकीत ठरले असल्याची माहिती कृती समितीच्या राज्य चिटणीस कमल परूळेकर यांनी दिली.
मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अंगणवाडी कर्मचारी आपले नियमित काम करून या संकटातही सर्वेक्षण करण्याचे काम करीत होते. मात्र काही जिल्हय़ांमध्ये त्यांना विविध प्रकारची कामे करण्यास सांगितले जात होते. यामुळे आता कोरोनाचे कामच न करण्याचा निर्णय राज्य कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे मंत्री ठाकूर, आयुक्त यांच्याबरोबर समितीची नुकतीच बैठक झाली.
यावेळी कृती समितीने आपले म्हणणे ठाकूर यांना सांगितले. ते त्यांनाही मान्य झाले. त्यामुळे त्यांनी बैठक सुरू असतानाच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दूरध्वनी करून आता अंगणवाडीचे पूर्ण काम कर्मचाऱयांना करायचे असल्यामुळे कोरोनाविषयक काम त्यांना करता येणार नाही, असे सांगितले. यास वडेट्टीवार यांनीही संमत्ती दिली व ते लवकरच तसे पत्र संबंधित विभागांना देणार आहेत. तसेच अंगणवाडी उघडायची नाही, मात्र ग्रोथ मॉनिटरींग, वजने, लसीकरण ही अंगणवाडीची सर्व कामे करून त्यांच्या मोबाईलवर नोंदी करण्याचे ठरले. तसेच दरमहा पेन्शन देण्याबाबत समितीने आपली भूमिका मांडली यावर ठाकूर यांनी याचा तपशील ठरवण्यासाठी अजून काही वेळ जाईल, असे स्पष्ट केल्याचे परूळेकर यांनी सांगितले.
धोक्याच्या ठिकाणी वजने घेऊ नका : परूळेकर
या बाबत बोलताना परूळेकर म्हणाल्या की, कोरोनाचे काम करायचे नाही हे आता निश्चित झाले आहे. मात्र नियमित काम करताना रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये मुलांची वजने घ्यायला जायचे नाही, आपण आपल्यासह लाभार्थ्यांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, कोरोनाचे काम करण्याचा अधिकारी, सरपंच व अन्य कोणीही दबाव आणल्यास त्यांना संघटनेच्या पत्रांची प्रत द्यावी, तरीही दबाव आला तर काम करू नये व तसे संघटनेला कळवावे, असे आवाहनही परूळेकर यांनी कर्मचाऱयांना केले आहे.