चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी संयुक्त सज्जता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या बेमुर्वतखोरपणाला वेसण घालण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी बंयालच्या उपसागरात स्नौदलाचा संयुक्त सराव करण्याची तयारी चालविली आहे. या सरावात जपानच्या युद्धनौकाही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ समुद्रात हा सराव होणे शक्य आहे.
जगातील सर्वात मोठी युद्धनौका समजली जाणारी अमेरिकेची ‘निमित्झ’ या सरावात भाग घेणार आहे. सध्या ही नौका हिंदी महासागरात उपस्थित आहे. मलाक्काच्या सामुद्रधुनीतून ही नौका हिंदी महासागरात आली आहे. याच सामुद्रधुनीतून चीनला कच्च्या इंधन तेलाचा बव्हंशी पुरवठा होत असतो. त्यामुळे अमेरिकेने आपली युद्धनौका याच भागात आणली आहे.
लडाख तणावाची पार्श्वभूमी
लडाख येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चीनने आपले सैनिक आणल्याने तणाव निर्माण झाला होता. आता चीनी सेना या रेषेपासून काहीही मागे गेली आहे. मात्र अद्यापी ती सुरक्षित अंतरापर्यंत मागे गेलेली नाही. त्यामुळे भारतानेही आपल्या सेनेच्या अनेक तुकडय़ा, रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमाने याच भागात नियंत्रण रेषेजवळ सज्ज ठेवली आहेत.
चीन पडला एकाकी
चीनने भारताच्या नियंत्रण रेषेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने जगातील इतर बलाढय़ देशांनीही चीनचा निषेध केला आहे. अमेरिकेने दक्षिण चीनी सागरात दोन विमानवाहू युद्धनौका आणून चीनवर दबाव आणला आहे. याच दबावतंत्राचा भाग म्हणून सदर नौदल सराव होणार आहे.
हिंदी महासागरातही…
चीनने सध्या हिंदी महासागरातही आपल्या काही युद्धनौका आणल्या आहेत. भारतावर दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा सराव भारतासाठी महत्वाचा आहे.