जिल्हाधिकाऱयांचे माजी नगरसेवकांना आश्वासन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकायदेशीररित्या जी घरपट्टी वाढविण्यात आली आहे त्याबाबत माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोरोनामुळे जनता त्रस्त आहे. कर भरण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांनी म्हणणे ऐकून येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
कोरोनामुळे बेळगावातील जनता अडचणींना कशी टक्कर देत आहेत याची माहिती देण्यात आली. सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊनही चर्चा करण्यात आली. यावेळी सुरेश अंगडी यांनी सोमवारी पालकमंत्र्यांसोबत बैठक असून याबाबत तेथे निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष माजी महापौर नागेश सातेरी यांनी केले. चिटणीस दीपक वाघेला, माजी नगरसेवक संजय प्रभू, मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, आप्पासाहेब पुजारी, विजय मोरे यांच्यासह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते.