ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशात कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.
देशांतर्गत वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता इतर देशातून टीव्हीची मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतात टीव्ही निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलँड आणि जर्मनी यांचा समावेश आहे. भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे व्हिएतनाम आणि चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणार आहे.
केंद्र सरकारने हे निर्बंध 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी घातले आहेत. तसेच 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेसाठीही हा आदेश लागू होणार आहे. मागील वर्षी भारतात 428 मिलियन डॉलर किंमतीच्या टीव्हीची आयात करण्यात आली होती. त्यामधील 293 मिलियन डॉलरचे टीव्ही व्हिएतनाममधून आयात करण्यात आले होते.