दापोली /प्रतिनिधी
गेले दोन दिवस पडणाऱ्या धुवांधार पावसाने कोकणातील समुद्राला उधाण आले आहे. या उधाणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी खडकावर आपटून जखमी झालेल्या समुद्रातील ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान देण्यात हर्णे येथील निसर्गप्रेमी मित्रांना यश आले आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे- पाळंदे रस्त्यालगत असणार्या संरक्षक भिंती नजीक हे सागरी कासव निसर्गप्रेमी प्रीतम साटवीलकर यांच्या निदर्शनात पडले. त्यांनी आपल्या मित्रांसमवेत या सागरी कासवाला सुरक्षित ठिकाणी आणले. यानंतर त्यांनी वनखात्याची संपर्क केला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी दाखल होत या सागरी कासवाला ताब्यात घेतले व अधिक उपचारासाठी दापोलीत आणले.
याकामी सागर मयेकर, प्रीतम मयेकर, प्रीतम साटविलकर, वनपाल खेडेकर, वनपाल सौ. जगदाळे, सुरज जगताप यांचे सहकार्य लाभले. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.