ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधील वुहान प्रांतामधून आलेला कोरोना विषाणू विरुद्धची लढाई जगभरात अजूनही सुरूच आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखी एक व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या नवीन व्हायरसने आतापर्यंत 7 जणांचा बळी घेतला आहे. तर 60 जणांना त्याची लागण झाली आहे.
चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसचे नाव टिक बॉर्न व्हायरस असे आहे. या नवीन व्हायरस चा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो असा सावधानतेचा इशाराही दिला आहे. याआधी चीनच्या जियांग्सू प्रांतात या वर्षीच्या सुरुवातीला एसएफटीएस व्हायरसमुळे 37 पेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. त्यानंतर पूर्व चीनमधील अनहुई राज्यात देखील 23 जणांना लागण झाली आहे.
जियांग्सूची राजधानी असलेल्या नांजियांगमध्ये एका महिलेला सुरवातीला खोकला आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी तपासणी करताना त्या महिलेच्या शरीरात ल्यूकोसाईट आणि प्लेटलेट कमी झाल्याचे लक्षात आले. त्यानतंर साधारण एक महिना तिच्यावर उपचार केले. आणि त्यानंतर त्या महिलेची प्रकृती सुधारली व त्या महिलेला घरी सोडण्यात आले.
रिपोर्ट नुसार, अन्हुई आणि चीनच्या झेजियांग प्रांतात या व्हायरस मुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची माहिती चीनमध्ये 2011 मध्ये मिळाली होती.