वार्ताहर / बागणी
बागणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका ह्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे गावात पहिलाच रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. या शिक्षिका घरी एकट्याच राहत असल्याने व बाहेर कोठे कोणत्याही गावी गेल्या नसल्याने त्या कोणाच्या संपर्कात आल्या आहेत व कशा प्रकारे त्यांना लागण झाली याची आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन चौकशी करून त्या सर्व लोकांना होम कॉरंटाईन करणार आहे.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेत या भागाला कंटेंमेंट झोन घोषित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सरपंच संतोष घनवट व उपसरपंच विष्णू किरतसिंग तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका राजमाने म्हणाल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापर केला पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे. बेजबाबदार पणे वागून चालणार नाही. कामा शिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले.