खेर्डीतील नळपाणी योजना अतिक्रमण प्रकरण
चिपळूण
जमीन मालकास विश्वासात न घेता नव्या नळपाणी योजनेचा रस्ता करण्यासाठी वडिलोपार्जित खासगी जमिनीत अतिक्रमण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, माजी सरपंच व अधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या पाच जणांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. त्यामुळे या सर्वावर अटकेची टांगती तलवार आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंदथ रामचंद्र खताते, खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री जयंद्रथ खताते, ठेकेदार धोंडिराम रेडेकर, जीवन प्राधिकरण अधिकारी अपूर्वा पाटील, श्रेणी 1 चे सहाय्यक अभियंता रवि उदय जाधव यांच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद अप्पाजी बाळा दाभोळकर (खेर्डी-विठ्ठलवाडी) यांनी दिली होती.
गुन्हा दाखल होताच या पाचजणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. यादरम्यान त्यांना अंतरीम जामीनदेखील मंजूर झाला होता. मात्र सोमवारी दाभोळकर यांनी सादर केलेली कागदपत्रे व मांडलेले म्हणणे लक्षात घेतल्यानंतर न्यायालयाने अंतिम आदेश देतेवेळी अटकपूर्वसाठीचा जामीन अर्ज फेटाळला. यामुळे या पाचजणांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.