प्रतिनिधी/ बेळगाव
मोदगा, ता. बेळगाव येथील दोन मंदिरात चोरी झाली आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचे हे दोन्ही प्रकार उघडकीस आले असून मारिहाळ पोलीस स्थानकात या दोन्ही प्रकरणांची नोंद झाली आहे.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप फोडून चोरटय़ांनी 55 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले आहेत. 18 ऑगस्ट रोजी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे देवीच्या अंगावर दागिने घालण्यात आले होते. हे दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत.
दुसरी घटना श्री सिद्धेश्वर मंदिरात घडली आहे. चोरटय़ांनी मंदिरातील दानपेटी पळविली आहे. या दानपेटीत पाच हजार रुपयांहून अधिक रक्कम होती. चोरटय़ांनी ही दानपेटी पळविली आहे. यासंबंधी शोभा मल्लेशी बडीगेर यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत.