परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांची माहिती
नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोबर तर बॅकलॉगच्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
बहुपर्यायी पध्दतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेसाठी 50 गुण, परीक्षेसाठी 1 तासाचा वेळ
प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प परीक्षा 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील पदवीच्या अंतिम सत्रांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोबर व बॅकलॉगच्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरु होणार आहेत. या परीक्षा बहुपर्यायी पध्दतीने घेण्यात येणार असून 50 गुणांसाठी 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे. नियमीत परीक्षेसाठी 45 हजार तर बॅकलॉगच्या 30 हजार असे एकूण 75 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहीती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा 10 ऑक्टोंबरपासून सुरू होणार असून वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रक व हॉलतिकीट संगणक प्रणालीतून उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने 50 गुणांसाठी बहुपर्यायी पध्दतीने घेतली जाणार आहे. परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीतून होणार आहेत. त्यामुळे नियमित, बॅकलॉग आणि दूरशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक महाविद्यालय, अधिविभागामार्फत 17 सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे बंधनकारक आहे.
अंतिम वर्षास प्रवेशित व अनुषेश (बॅकलॉग) च्या परीक्षा 1 ऑक्टोबरपासून महाविद्यालय स्तयावर होणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 50 गुणांची, एक तासाची, बहुपर्यायी पध्दतीने (एमसीक्यू) पध्दतीने महाविद्यालय, अधिविभागस्तरावर घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिकाही संबधित महाविद्यालय, अधिविभागातील प्राध्यापकांकडून तयार करुन घेतल्या जाणार आहेत. महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर आयोजित परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या संगणक प्रणालीत भरावयाचे आहेत. परीक्षेसंदर्भातील सर्व कामे महाविद्यालय, अधिविभाग स्तरावर करण्यात येणार आहे.
दूरशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या-त्या महाविद्यालय, अभ्यास केंद्रावर घेण्यात येणार आहेत. संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार करावयाच्या आहेत. एखाद्या महाविद्यालयात दूरशिक्षण अभ्यासकेंद्राकडील विषय शिकविला जात नसल्यास जवळच्या महाविद्यालयातील शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका तयार करून घ्याव्यात. उत्तरपत्रिका तपासून या विद्यार्थ्यांचे गुण संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावेत. याबाबत शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राकडून मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना पत्रकाव्दारे देण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानाव्दारे परीक्षा घेण्याची अधिविभागप्रमुखांसह प्राचार्यांना मूभा…
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, प्रकल्प परीक्षा 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी आवश्यक लिंक 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात न बोलविता तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा घेण्याची मूभा अधिविभाग प्रमुख, प्राचार्य यांना देण्यात आली आहे. परीक्षा घेताना सध्या असणाऱया प्रात्यक्षिक परीक्षेच्या कमाल गुणामध्ये कोणताही बदल करण्यात येवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यास सर्वेच्च प्राधान्य द्या…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देवून परीक्षा पध्दतीचा अवलंब करावा. सर्वच परीक्षांसाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. परीक्षार्थीची कोणतीही तक्रार विद्यापीठाकडे येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.