सदोष पीपीई किटसंदर्भात आज पाहणी; प्रत्येक वॉर्डमधील एका बॉक्समध्ये सदोष कीट
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका वॉर्डमध्ये सदोष पीपीई किट दिसून आली. एका बॉक्समध्ये मिळून आलेली सदोष कीट अधिष्ठात्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीत शुक्रवारी सीपीआरमधील सर्वच वॉर्डमधील पीपीई कीट बॉक्सची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना साथ सुरू झाल्यानंतर प्रारंभी वैद्यकीय स्टाफने जीव धोक्यात घालून उपचार सुरू केले. त्यानंतर सुरूवातीला मिळालेल्या पीपीई कीटमध्ये काही दोष होते. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ती नव्याने घेण्यात आली. त्यानंतर पीपीई कीटसंदर्भात आजपर्यंत सीपीआर प्रशासनाकडे तक्रारी आलेल्या नव्हत्या. पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सदोष पीपीई कीटसंदर्भात स्टाफमध्ये चर्चा सुरू होती.
`सीपीआर’मधील एका वॉर्डमध्ये 15 जणांचा स्टाफ कार्यरत असतो. प्रत्येक वॉर्डसाठी 40 पर्सनल प्रिव्हेंशन कीटचा बॉक्स देण्यात येतो. अशाच एका वॉर्डलाही असे तीन बॉक्स देण्यात आले. एका बॉक्समधील सदोष कीटमुळे 50 टक्के पीपीई कीट एकाच ड्युटीत वापरले गेले. यावर चौकशी करता पीपीई कीट सदोष असल्याची बाब गुरूवारी दुपारी निदर्शनास आली.
दरम्यान, वॉर्डमधील परिचारिकांनी सदोष पीपीई कीटचा बॉक्सच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना दाखवला. तसेच यापुर्वी असे झाले नव्हते, सध्याच्या लॉटमध्येच सदोष पीपीई कीट दिसून येत असल्याचे स्टाफने अधिष्ठात्यांना सांगितले. यावर अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी तातडीने पीपीई कीट संदर्भातील समितीची बैठक बोलावली. या बैठकीत सदोष पीपीई कीटवर जोरात चर्चा झाली. चर्चेत पीपीई कीट संदर्भातील समितीत परिचारिकांचा एक सदस्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, अधिष्ठात्यांशी झालेल्या बैठकीत शुक्रवारी प्रत्येक कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पीपीई कीटच्या बॉक्सची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी दिसून येणारे सदोष पीपीई कीट बाजूला करण्यात येणार आहेत. तसेच पीपीई कीट पुरवठा करणार्या अन्य कंपन्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बॉक्समध्ये चिकटपट्टी लावलेले, वापरलेली, खराब कीट
सध्या वॉर्डमध्ये मिळून आलेल्या पीपीई कीट बॉक्समध्ये चिकटपट्टी लावलेले, वापरलेले, मळलेले कीट दिसून आले आहेत. वापरलेले कीट परत येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. केंद्राच्या गाईडलाईन्सनुसार ही कीट आहेत का, यापुर्वीच्या कीटमध्ये श्वास घेण्यास त्रास होत नव्हता, पण या कीटमधून श्वास घेण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे रक्तदाब कमी होणे, चक्कर येण्याचा त्रास स्टाफला भोगावा लागत आहे. त्यामुळे निर्दोष कीट मिळावीत, अशी मागणी होत आहे.
अतिदक्षता विभागात कार्यरत स्टाफला बाहेरून हवा मिळत नाही. पीपीई कीट घातल्यानंतर त्याचा त्रास त्यांना होत आहे. त्याच्या रिऍक्शन येत आहेत. स्टाफमधील 40 टक्के स्टाफ बाधीत झाला आहे. त्याला सदोष पीपीई कीटही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मनुष्यबळ कमी असल्याने 7 दिवसांचा कोरोटाईन तीन दिवसांवर आणल्याने स्टाफमधून नाराजी व्यक्त होत आहे.