ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. आज तीन व्यक्तींना ही लस देण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एथिक कमिटीने केईएम रुग्णालयाला कोविशिल्ड लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली. त्यानंतर स्वयंसेवकांचे स्क्रीनिंग सुरू करण्यात आले. गुरुवारी तीन स्वयंसेवक चाचणीत योग्य ठरल्याने त्यांची आरटीपीसीआर आणि अँटीबॉडी चाचणीही करण्यात आली. ती चाचणीही निगेटिव्ह आल्याने आज त्यांना केईएम रुग्णालयात लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.
आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या 13 स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून 10 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. केईएम रुग्णालयात 100 जणांवर ‘कोव्हिशिल्ड’ लसीची चाचणी केली जाणार आहे.