ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या जागतिक महामारीचे संकट लवकर दूर व्हावे आणि कोरोना विषाणू नष्ट करणारी लस लवकर विकसित व्हावी, असा संकल्प करीत औषध शास्त्रातील आद्य पूजनीय दैवत धन्वंतरी यांच्याकडे धन्वंतरी यज्ञाद्वारे प्रार्थना करण्यात आली. कोरोनामुक्त भारतासाठी दगडूशेठ दत्तमंदिरामध्ये हा धन्वंतरी यज्ञ पार पडला.
बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे अधिक मासानिमित्त श्री विष्णु याग व श्री धन्वंतरी याग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, वंदना मोहिते यांसह कर्मचारी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित होते.
ट्रस्टचे यंदा 123 वे वर्ष आहे. मंदिरात धन्वंतरी याग डॉ.चंद्रभान पाटील व नयना पाटील यांच्या हस्ते पार पडला. तर, विष्णुयाग ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर हलवाई व नूतन हलवाई यांच्या हस्ते झाला.
अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर मानवजातीवरील हे अरिष्ट लवकर दूर व्हावे यासाठी अधिकमासात श्री विष्णू यागासह श्री धन्वंतरी यागाचे विशेष आयोजन करण्यात आले. समुद्रमंथनातून अमृतकुंभ घेऊन येणारे धन्वंतरी हे औषधशास्त्रातील आद्य पूजनीय दैवत आहेत. त्यांच्या कृपेने कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करणारी लस लवकर विकसित व्हावी असा संकल्प करून समस्त जगतातील मानवाला आरोग्यपूर्ण निरामय जीवन लाभावे म्हणून प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.
डॉ.चंद्रभान पाटील म्हणाले, धन्वंतरी याग व यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे आम्हालाही या महामारीचा मुकाबला करण्याचे बळ मिळते. आमच्या वैद्यक शास्त्रातील धन्वंतरी हे आद्य दैवत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दूर करावे, अशी प्रार्थना आम्ही त्यांच्या चरणी करीत आहोत.