प्रतिनिधी / कोल्हापूर
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री शाहू विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटीचे 25 वर्षे विद्यमान संचालक असलेले प्रकाश भाऊसो डुम (वय 51) यांनी कोरोनाशी तीस दिवस झुंज देवून त्यावर मात केली. घरी येताच नातेवाईक, मित्र मंडळीनी त्यांचे मोठे स्वागत केले. काही तासानंतर त्याला अचानक श्वासोच्छवासचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला उपचाराकरीता कोल्हापूरातील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. पण सोमवारी सकाळी उपचारादरम्यान कोरोनावर जीत केलेल्या `प्रकाश’ ने काळासमोर हार पत्करली.
प्रकाश डुम हे उत्तम शेतकरी व ऊस वाहतुकदार व्यावसायिक म्हणून काम करीत होते. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे घरच्यांनी त्यांना उपचारासाठी कोल्हापूरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. त्यानंतर काही दिवस त्याला व्हेंटिलेटवर देखील ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर 30 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांने कोरोनाला हरवून त्यावर जीत केली. कोरोनाशी झुंज देवून तो हॉस्पीटलमधून पुर्णत: बरा होवून घरात आला.
नातेवाईक, मित्र मंडळीनी त्यांचे स्वागत केले. काही तासानंतर त्यांना पुन्हा श्वासोच्छवासचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला त्वरीत पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी अखेर प्रकाशची ज्योत मालवली. ते श्री शाहू सोसायटीच्या विद्यमान संचालकबरोबर युथ डेव्हलपमेंट क्लब आणि विजय पाणी पुरवठा संस्थेचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.