केनिन, कॉलिन्स, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत दाखल, स्विटोलिनाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
अर्जेन्टिनाच्या नादिया पोडोरोस्का हिने प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला असून पात्रता फेरीतून येऊन या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती पहिली महिला टेनिसपटू बनली आहे. याशिवाय बिगरमानांकित डॅनियली कॉलिन्सने टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरची ऐतिहासिक घोडदौड रोखत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविले. तसेच अमेरिकेची सोफिया केनिन, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तर युक्रेनच्या स्विटोलिनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
अर्जेन्टिनाच्या पोडोरोस्काने युक्रेनच्या तिसऱया मानांकित एलिना स्विटोलिनाचा 6-2, 6-4 असा पराभव करीत पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 131 व्या स्थानावर असणाऱया पोडोरोस्काने या स्पर्धेत दुसऱयांदा मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. यापूर्वी 1997 मध्ये या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पात्रता फेरीतून आलेल्या बेल्जियमच्या फिलिप डेवुल्फने उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला होता. कॉलिन्सने कारकिर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना जेबॉरचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला. ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठणारी जेबॉर ही अरब देशातील पहिली महिला होती. जागतिक क्रमवारीत 57 व्या स्थानावर असणाऱया कॉलिन्सने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली आणि दुसऱया सेटमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण जेबॉरने नियंत्रण मिळवित मुसंडी मारत सलग पाच गेम्ससह हा सेट जिंकून बरोबरी साधली. तिची पुढील लढत चौथ्या मानांकित सोफिया केनिनशी होणार आहे. केनिनने फ्रान्सच्या फिओना फेरोचे आव्हान 2-6, 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले. केनिनने या वर्षी झालेली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित जोकोविचने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना रशियाच्या कॅरेन खचानोव्हचे कडवे आव्हान 6-4, 6-3, 6-3 असे मोडून काढले. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही चौदावी वेळ आहे. या सामन्यातही पहिल्या सेटवेळी जोकोविचच्या रॅकेटमधून गेलेला एक चेंडू लाईनजजच्या डोक्याला लागला, तेव्हा अमेरिकन ओपन स्पर्धेतील आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी असा प्रकार घडल्यानंतर त्याला स्पर्धेबाहेर काढण्यात आले होते. पण यावेळची घटना अनावधानाने झाली होती. त्यामुळे त्याच्यावर अशी कारवाई झाली नाही. मात्र त्याने ताबडतोब लाईनजजकडे जाऊन त्यांची विचारपूस केली आणि माफीही मागितली. एकंदर ग्रँडस्लॅममध्ये 47 व्या वेळी तर येथे सलग 11 व्या वेळी त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याची पुढील लढत जर्मनीचा डॅनियल अल्टमायर किंवा 17 वा मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टा यापैकी एकाशी होईल. केनिन, कॉलिन्स, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत दाखल, स्विटोलिनाचे आव्हान समाप्त