ऑनलाईन टीम / मुंबई :
अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने अजूनही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आज भाजपने मंदिर उघडा आंदोलन पुकारले आहे.
- मुंबई : सिद्धिविनायक मंदिराबाहेर घंटनाद
भाजपने आज सकाळी 11 वाजता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दारात घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले होते.
- पुणे : तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर वाद्यांचा गजर
पुण्यात शहर भाजपच्या वतीने आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर विविध वाद्यांचा गजर करत हे आंदोलन करण्यात आलं. कुंभकर्णासारख्या गाढ झोपलेल्या सरकारला प्रतिकात्मक जागे करण्याचा प्रयत्न असल्याने यावेळी भाजपकडून सांगण्यात आले. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
तर कोल्हापुरातील शेष नारायण मंदिरबाहेर, सोलापुरात मल्लिकार्जुन मंदिराजवळ आणि परभणीतील 50 देवळांमध्ये आंदोलन करण्यात आले. शिर्डीतही भाजपनेे आंदोलन करत साई मंदिर सुरु करण्याची मागणी केली.
- सिद्धिविनायक मंदिरात घुसणारे प्रवीण दरेकर, लाड पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.