लागतोय घरबांधणीचा अर्धा खर्च : 2 किलोवॅटसाठी वर्षाला मोजावे लागताहेत 50 हजार रुपये
सुशांत कुरंगी/ बेळगाव
आपले स्वत:चे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणे हे आता सर्वसामान्यांच्या आवाक्मयात राहिले नाही. जागांचे वाढलेले दर, बांधकामाच्या साहित्याचे वाढलेले दर, कामगारांचा पगार यामुळे घराचे काम पूर्ण करेपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. त्यातच आता घरबांधणीसाठी लागणारा (2 किलो वॅट) प्रिपेड टेंपररी विद्युत मीटर घेण्यासाठी व त्याचे भाडे भरण्यासाठी वर्षाला अंदाजे 50 हजार रुपये खर्च होत आहे. त्यामुळे घर बांधणीचा अर्धा खर्च मीटर घेण्यासाठी लागत असल्याने घर बांधायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
वीजवितरणामध्ये सुलभता आणण्यासाठी विद्युत कंपन्यांनी प्रिपेड मिटर वापरण्यास सुरूवात केली. प्रायोगिक तत्त्वावर टेंपररी मिटर हे प्रिपेड करण्यात आले. परंतु हे टेंपररी मिटर ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तांत्रिक बाबींचा संदर्भ देऊन अव्वाच्या सव्वा पैसे घेण्यात येत आहेत. यामुळे प्रिपेड मिटरपेक्षा पोस्टपेड मिटर परवडले अशी प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करीत आहेत. प्रिपेड मिटरसाठी ऍडव्हान्स भरूनही महिन्याला जीएसटी सकट भाडे भरावे लागत आहे. बिल भरूनही भाडेही देण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. यामुळे टेंपररी मिटरच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.
घराच्या बांधकामासाठी प्रिपेड टेंपररी मीटरच बसवावा लागतो. बांधकामाच्या आकारानुसार 1 ते 5 किलोवॅट क्षमतेचा विद्युत मीटर बसवावा लागतो. बार कटिंग, पाण्याची मोटार, ड्रिल मशीन, कटर मशीन, पॉलिश मशीन वापरण्यात येत असते. त्यामुळे लहान घर असेल तर 1 किलोवॅट तर थोडे मोठे घर असेल तर 2 किलोवॅट किंवा त्याहून अधिक किलोवॅटचा प्रिपेड मीटर बसवावा लागतो.
डिपॉझिट घेवून मीटरचे भाडेही घेण्याचा अजब प्रकार
हेस्कॉमकडून मनमानी कारभार सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. नवीन टेंपररी मीटर घेतल्यानंतर ग्राहकाकडून डिपॉझिटची रक्कम भरून घेतली जाते. परंतु डिपॉझिटची रक्कम घेवूनही ग्राहकांकडून महिन्याला भाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे एकतर डिपॉझिटची रक्कम घ्या, अन्यथा भाडे अशी मागणी ग्राहकांमधून करण्यात येत आहे.
तपासणीविनाच दिले जाताहेत मीटर
एका ग्राहकाने टेंपररी मीटर वापरल्यांनतर तो ग्राहक मीटर पुन्हा हेस्कॉमकडे जमा करतो. त्यानंतर तोच मीटर पुन्हा दुसऱया ग्राहकाला देण्यात येतो. परंतु तो मीटर तपासणी करण्याच्या अगोदरच इतर ग्राहकांना देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीच जर मीटरमध्ये कोणताही बिघाड झाला असेल तर त्याचा फटका नव्या ग्राहकाला बसत असून त्यांच्याकडून दंड वसूली करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नवीन मीटर देताना ते तपासणी करूनच देणे गरजेचे आहे.
चौकट करणे
घराचे काम पूर्ण झाल्यानंतर टेंपररी मिटर जमा करून परमनंट मिटर घेतला जातो. टेंपररी मिटरचे कोणतेही बिल शिल्लक असल्यास त्याची वसुली ही परमनंट मिटरच्या बिलातूनही केली जाते. परंतु एखाद्या वेळेस ग्राहकाची रक्कम जर टेंपररी मिटरवर शिल्लक राहिली असेल तर अर्ज केल्याशिवाय ती रक्कम ग्राहकाला मिळत नाही. ग्राहकांकडे पैसे राहिले तर वेगळा न्याय आणि हेस्कॉमकडे पैसे राहिले तर वेगळा न्याय का? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
युनिट प्रमाणे पैसे आकार
आर. एम. कुंटे (अध्यक्ष- सरकारमान्य विद्युत कंत्राटदार संघटना, बेळगाव)
प्रिपेड मीटर ग्राहकांना देण्यात आले आहेत. परंतु त्या विषयी ग्राहकांना माहिती नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक वीज वापरल्यानंतर मीटर ट्रीप होणे गरजेचे असते. परंतु अधिक वीज वापरली म्हणून त्या ग्राहकाला दंड घालण्यात येत आहे. त्यामुळे प्रिपेड मीटर बंद करून पूर्वीप्रमाणे युनिटप्रमाणे बिलाचे पैसे घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
एक किलोवॅट मिटरसाठी अंदाजे येणारा खर्च
ऍडव्हान्स एनर्जी चार्जिस – 3900 रुपये
प्रिपेड मिटरचे भाडे – 900 रुपये
जीएसटी – 162 रुपये
मिटर सिक्मयुरीटी डिपॉझिट – 6800 रुपये