तीन सत्रात परीक्षेचे नियोजन, 48 हजार विद्यार्थी देणार ऑनलाईन पद्धतीने परीक्षा
प्रतिनिधी / कोल्हापूर
तांत्रीक कारणास्तव तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील शेवटच्या सत्राच्या परीक्षांना आज (मंगळवार) पासून प्रारंभ होत आहे. सुमारे 48 हजार 258 विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने तर 24 हजार 475 विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत असल्याने परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन परीक्षा विभागासमोर आहे. परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मेलवर हॉल तिकीट पाठविण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले आहे. 31 ऑक्टोंबर पर्यंत परीक्षा घेवून 10 नोव्हेंबर पूर्वी निकाल लावण्याच्या सुचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. यानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन शिवाजी विद्यापीठाने केले होते. मात्र विविध कारणांमुळे तीन वेळा परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज (मंगळवार 27) पासून परीक्षांना प्रारंभ होत आहे. एकूण 72 हजार 733 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी 48 हजार 258 विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा तर 24 हजार 475 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. पहिल्याच दिवशी एम. बी. ए, एम. एस. डब्ल्यू, फार्मसी, बी. व्होक अशा चार अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.
परीक्षेची सर्व तयारी पुर्ण झाली असून विद्यार्थ्यांनी निसंकोच पणे परीक्षेला सामोरे जावे. काहीही तांत्रिक अडचण आल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. ऑफलाईन संदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा तसेच ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही, त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, कॉलेज आय कार्ड घेवून जाण्याचे आवाहन परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तीन सत्रात होणार परीक्षा
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. एका दिवसांत तीन सत्रात परिक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा विभागाने केले आहे. सकाळी 11 ते 12, 1.30 ते 2.30, 4 ते 5 अशा तीन सत्रात ही परिक्षा घेवून विविध विषयांच्या परिक्षा पुर्ण केल्या जाणार आहेत.
कुलगुरुंनी घेतला आढावा
परीक्षेची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी सकाळी परीक्षा विभागाची बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. तसेच ऑफलाईन परीक्षेबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्य तसेच प्रमुखांची बैठक घेवून सुचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांचा लॉगिन व पासवर्ड पाठविण्यात आला आहे.———————————
ऑनलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी ः 48 हजार 258
ऑफलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी ः 24 हजार 475
एकूण परीक्षा ः 155
परीक्षा केंद्रे (तीन जिल्हे) ः 293
भरारी पथके ः प्रत्येक जिह्यासाठी 2