सामनावीर ऋतुराजचे सलग दुसरे अर्धशतक, चेन्नईचा केकेआरलाही पराभवाचा झटका
वृत्तसंस्था/ दुबई
शेवटच्या 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना कमलेश नागरकोटीच्या गोलंदाजीवर डावखुऱया रविंद्र जडेजाने सलग दोन सणसणीत षटकार खेचत चेन्नई सुपरकिंग्सला केकेआरविरुद्ध रोमांचक विजय प्राप्त करुन दिला आणि या हंगामात जाता जाता प्रतिस्पर्ध्यांना दे धक्का देण्याची परंपरा कायम राखली. सलग 2 अर्धशतके झळकावणारा ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला. या निकालामुळे केकेआरचा संघ 16 गुणांवर पोहोचू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमधील स्थान देखील निश्चित झाले.
शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूत करणने 3 धावा केल्या तर जडेजाने चौथा चेंडू निर्धाव घालवला. पण, नंतर 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना जडेजाने डीप मिडविकेटकडे षटकार खेचत संघाला बरोबरी प्राप्त करुन दिली व शेवटच्या चेंडूवर वाईड लाँगऑनच्या दिशेने आणखी एक षटकार खेचत रोमांचक विजयही संपादन करुन दिला.
शेवटच्या 2 षटकात 29 धावांची गरज असताना जडेजा व करण ही जोडी क्रीझवर होती. फर्ग्युसनच्या डावातील 19 व्या षटकात त्यांनी 19 धावा वसूल केल्या होत्या. याचा त्यांना पुरेपूर लाभ घेता आला.
विजयासाठी 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात सर्वसाधारण स्वरुपाची राहिली. वॅटसन व ऋतुराज यांनी 7.3 षटकात 50 धावांची सलामी जरुर दिली. त्यानंतर रायुडू (38) मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने चेन्नईला धक्का बसला. अनुभवी कर्णधार धोनीला वरुणने त्रिफळाचीत करत चेन्नईच्या गोटात आणखी खळबळ उडवून दिली. ऋतुराजने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. तो नंतर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि चेन्नईला बॅकफूटवर यावे लागले. पण, त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जडेजाने सलग दोन षटकार खेचत केकेआरचे विजयाचे मनसुबे पार धुळीस मिळवले.
सलामीवीर नितीश राणाने अवघ्या 61 चेंडूत 87 धावांची आतषबाजी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 20 षटकात 5 बाद 172 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. केकेआरतर्फे शुभमन गिलने 17 चेंडूत 26 तर दिनेश कार्तिकने 10 चेंडूत नाबाद 21 धावांचे योगदान दिले. चेन्नईचा जलद गोलंदाज एन्गिडीने 34 धावात 2 गडी बाद केले.
सलामीला उतरलेल्या नितीश राणाने 18 व्या षटकापर्यंत झुंज देत तडफदार अर्धशतक झळकावले आणि याचमुळे केकेआरला सहजपणे पावणेदोनशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले होते.
नितीश राणाची झुंजार फलंदाजी हेच केकेआरच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.
एकीकडे, आघाडी व मध्यफळीतील बहुतांशी फलंदाज सपशेल अपयशी ठरत असताना राणाने जोरदार फटकेबाजीवर भर दिला आणि चेन्नईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाला चौफेर पिटाळत ठेवण्याचा सिलसिला कायम राखला.
एन्गिडीच्या डावातील 18 व्या षटकात राणा लाँगऑनवरील करणकडे झेल देत तंबूत परतला. एन्गिडीने ऑफस्टम्पवर फुल ऑफकटर टाकत राणाला चेंडू स्लॉग करण्याच्या मोहात पाडले आणि यात राणाकडून चूक झाली. उत्तूंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि करणने सोपा झेल टिपला. राणा बाद झाला, त्यावेळी चेन्नईची 4 बाद 137 अशी स्थिती होती.
तत्पूर्वी, धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. सलामीवीर शुभमन गिल व नितीश राणा या जोडीने 7.2 षटकात 53 धावांची सलामी दिली होती.
यात युवा फलंदाज गिलचा 17 चेंडूत 26 धावांचा वाटा मोलाचा राहिला. कर्ण शर्माने गिलचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. वास्तविक, शुभमन गिलने उत्तम फटकेबाजी करत मोठय़ा खेळीच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली होती. पण, कर्णच्या स्लायडरवर चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीवर आदळला आणि गिलची खेळी येथे संपुष्टात आली.
सुनील नरेनला या सामन्यातही सूर सापडला नाही. त्याने 1 षटकार जरुर खेचला. पण, 7 चेंडूत 7 धावा, अशा किरकोळ धावसंख्येवर त्याला तंबूत परतावे लागले. सॅन्टनरने मिडल व लेगच्या मध्यात टॉस केलेल्या चेंडूवर नरेनचा अंदाज चुकला आणि डीप मिडविकेटवरील जडेजाने सोपा झेल टिपला. अलीगड पंजाबचा युवा फलंदाज रिंकू सिंगही स्वस्तातच बाद झाला. त्याने जडेजाला स्वीप करण्याच्या प्रयत्नात डीप स्क्वेअरवरील रायुडूकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला. रिंकू बाद झाला, त्यावेळी केकेआरने 12.5 षटकात 93 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर राणा व इयॉन मॉर्गन या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 46 धावांची भागीदारी साकारली.
एन्गिडीने राणाला बाद करत ही जोडी फोडली. मॉर्गन (12 चेंडूत 15) व दिनेश कार्तिक या केकेआरच्या आजी-माजी कर्णधारांनी अंतिम टप्प्यातील खेळात फटकेबाजीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि त्यांना थोडेफार यशही लाभले. 6 गडी बाकी असल्याने या उभयतांना प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याची मुभा लाभली आणि याचा त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करताना पाचव्या गडय़ासाठी जलद 30 धावा जोडल्या. मॉर्गन एन्गिडीच्या डावातील शेवटच्या षटकात ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद झाला. अर्थात, मॉर्गनच्या तुलनेत दिनेश कार्तिकने येथे अधिक आक्रमक फटकेबाजी केली.
धावफलक
केकेआर : शुभमन गिल त्रि. गो. कर्ण शर्मा 26 (17 चेंडूत 4 चौकार), नितीश राणा झे. करण, गो. एन्गिडी 87 (61 चेंडूत 10 चौकार, 4 षटकार), सुनील नरेन झे. जडेजा, गो. सॅन्टनर 7 (7 चेंडूत 1 षटकार), रिंकू सिंग झे. रायुडू, गो. जडेजा 11 (11 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन झे. गायकवाड, गो. एन्गिडी 15 (12 चेंडूत 2 चौकारांसह 15), दिनेश कार्तिक नाबाद 21 (10 चेंडूत 3 चौकार), राहुल त्रिपाठी नाबाद 3 (2 चेंडू). अवांतर 2. एकूण 20 षटकात 5 बाद 172.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-53 (शुभमन, 7.2), 2-60 (सुनील नरेन, 8.3), 3-93 (रिंकू सिंग, 12.5), 4-137 (राणा, 17.1), 5-167 (मॉर्गन, 19.2).
गोलंदाजी : दीपक चहर 3-0-31-0, सॅम करण 3-0-21-0, एन्गिडी 4-0-34-2, सॅन्टनर 3-0-30-1, रविंद्र जडेजा 3-0-20-1, कर्ण शर्मा 4-0-35-1.
चेन्नई सुपरकिंग्स : शेन वॅटसन झे. सिंग, गो. वरुण 14 (19 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ऋतुराज गायकवाड त्रि. गो. कमिन्स 72 (53 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), अम्बाती रायुडू झे. नरेन, गो. कमिन्स 38 (20 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. वरुण 1 (4 चेंडू), सॅम करण नाबाद 13 (14 चेंडूत 1 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 31 (11 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 4 बाद 178.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-50 (वॅटसन, 7.3), 2-118 (रायुडू, 13.4), 3-121 (धोनी, 14.4), 4-140 (ऋतुराज, 17.2),
गोलंदाजी : कमिन्स 4-0-31-2, नागरकोटी 3-0-34-0, नरेन 4-0-23-0, फर्ग्युसन 4-0-54-0, चक्रवर्ती वरुण 4-0-20-2, नितीश राणा 1-0-16-0.