सेन्सेक्स 172.61 तर निफ्टी 58.80 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी चढ-उताराच्या स्थितीमुळे भारतीय भांडवली बाजारांमध्ये घसरणीचे वातावरण राहिले होते. मुंबई शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात दबावाचे वातावरण राहिल्याने दिवसअखेर सेन्सेक्स 173 अंकांनी प्रभावीत होत सेन्सेक्स बंद झाला आहे.
दिवसभरात काही निर्देशांकांनी समाधानकारक हिस्सेदारी ठेवली आहे. यामध्ये एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये घसरणीची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच जागतिक बाजारात नकारात्मक कल राहिल्याचा परिणामही गुंतवणूकदारांना सहन करावा लागल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 172.61 अंकांनी घसरुन निर्देशांक 39,749.85 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 58.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 11,670.80 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक लार्सन ऍण्ड टुब्रो 5 टक्क्यांनी घसरली आहे. यासह टायटन, ओएनजीसी, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एचडीएफसी याही नुकसानीत राहिल्या आहेत. तर अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग नफा कमाईत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
जागतिक वातावरणाचा प्रभाव
भारतीय शेअर बाजारात प्रारंभीच्या काळात नरमाईचा कल गुरुवारी राहिला होता. हा नरमाईचा सूर निर्माण होण्यास युरोपातील कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रभाव कारणीभूत ठरला आहे.
प्रमुख क्षेत्राची कामगिरी
दिवसभरात धातू, वाहन, रियल्टी आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागात विक्री राहिल्याचे दिसून आले. तसेच अन्य बाजारात हाँगकाँग, सोल आणि टोकीयो बाजारांनी घसरणीची नोंद केली आहे. एकंदर बाजारात घसरणीचा सिलसिला सुरूच राहिला आहे.