नागोर्नो-काराबाखवरून पेटले युद्ध : 5 दिवसांत कब्जा करण्याचा मनसुबा उधळला
वृत्तसंस्था/ येरेवान
नागोर्नो-काराबाखवर कब्जा करण्यासाठी अजरबैजानने तुर्कस्तानसोबत मिळून एक मोठी व्यूहनीती आखली होती. तुर्कस्तान आणि इस्रायली शस्त्रांच्या बळावर अचानक हल्ला करून 5 दिवसांत नागोर्नो-काराबाखच्या मोठय़ा भूभागावर कब्जा करण्याचा डाव अजरबैजानने आखला होता. परंतु आर्मेनियाच्या सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्याने आता हे युद्ध दुसऱया महिन्यात पोहोचले आहे. या युद्धात अजरबैजान सरकारला त्याच्या अनुमानापेक्षाही अधिक मानवी तसेच आर्थिक हानी झेलावी लागली आहे.
अजरबैजानची खरी योजना अचानकपणे भीषण हल्ला करून 3 ते 5 दिवसांपर्यंत युद्ध लढण्याची होती, असे काकेकश भागात तैनात एका पाश्चिमात्य सैन्याधिकाऱयाने म्हटले आहे. या आक्रमक सैन्य कारवाईची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी झाली होती. रशियाच्या राष्ट्रपतींनुसार या युद्धात आतापर्यंत 5 हजार लोक मारले गेले आहेत.
आर्मेनियाविरोधात दहशतवादी
अजरबैजानच्या 5 दिवसांपर्यंतच्या युद्ध लढण्याच्या कालमर्यादेची पुष्टी मास्कोमध्ये तैनात एका युरोपीय सैन्याधिकाऱयाने दिली आहे. तुर्कस्तानने आर्मेनियाशी लढण्यासाठी 1 हजार सीरियन दहशतवाद्यांची भरती केली होती. या दहशतवाद्यांना अचानक हल्ला करायचा होता. अजरबैजानने आर्मेनियाच्या सैन्याला कमी लेखले, त्यांच्याकडे डोंगराळ भागात लढण्याचा भौगोलिक लाभ होता.
डाव फसला
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अजरबैजानने ही सैन्य कारवाई केली होती. आर्मेनियाला आंतरराष्ट्रीय मदत मिळेपर्यंत हेतू साध्य होईल असे अजरबैजानला वाटत होते. नागोर्नो-काराबाखच्या ज्या भागांवर कब्जा होईल, तेथे युद्धविराम लागू करण्याचा विचारही त्याने केला होता.
आर्मेनियाचा प्रतिकार
या युद्धासंबंधी रशियानेही उदासीन भूमिका स्वीकारली होती. इस्रायल आणि तुर्कस्तान आणि इस्रायलच्या घातक शस्त्रास्त्रांच्या मदतीने नागोर्नो-काराबाखच्या मोठय़ा हिस्स्यावर कब्जा करता येईल, असे अजरबैजानला वाटले होते. परंतु त्याला आर्मेनियाच्या सैन्याच्या चिवट प्रतिकाराला तोंड द्यावे लागले आहे. अजरबैजानने स्वतःचा पूर्ण जोर मागील काही दिवसांमध्ये शुशी शहरावर लावला आहे, हे शहर प्रतिकात्मक स्वरुपात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आर्मेनिया सैन्याच्या प्रतिकाराच्या प्रभावामुळे अजरबैजानचे विदेशमंत्री आता शस्त्रसंधीवर बोलण्यास तयार झाले आहेत.