डावखुरी फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनने अवघ्या 9 धावांमध्येच 4 फलंदाज गारद केल्यानंतर ट्रेलब्लेझर्सने आयपीएलमधील महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत व्हेलॉसिटी संघावर 9 गडी राखून सहज मात केली. इंग्लिश महिला क्रिकेटपटू इक्लेस्टोन आयसीसी टी-20 मानांकन यादीत सध्या अव्वलस्थानी विराजमान असून तिला या लढतीत झुलन गोस्वामी (2-13) व राजेश्वरी गायकवाड (2-13) यांनी समयोचित साथ दिली. यामुळे ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीचा 15.1 षटकातच 47 धावांमध्ये धुव्वा उडवला आणि नंतर 7.5 षटकात केवळ एका गडय़ाच्या बदल्यात 48 धावांचे सोपे लक्ष्य सर केले. सलामीवीर दियांद्रा डॉटिन व रिचा घोष अनुक्रमे 29 व 13 धावांवर नाबाद राहिले.
बुधवारी सुपरनोव्हाजविरुद्ध विजय संपादन केला असला तरी गुरुवारी येथे नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला असल्याने व्हेलॉसिटीच्या धावगतीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. ट्रेलब्लेझर्सने 9 गडी राखून सहज विजय संपादन केला असला तरी प्रारंभी त्यांना फटकेबाजीसाठी फारशी मोकळीक मिळाली नव्हती. कर्णधार स्मृती मानधना 9 धावांवर बाद झाली. ट्रेलब्लेझर्सने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 28 पर्यंत मजल मारली होती. नंतर त्यांनी सहज आगेकूच करत विजयावर शिक्कामोर्तब केले.