ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ 2 लाख 7 हजार अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना होणार आहे.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने गुरुवारी यासाठीचा शासन निर्णय जारी करून अंगणवाडीसेविकांना दोन हजार रुपये प्रमाणे भेट देण्यासाठी निर्णय जाहीर केला आहे. यासाठी सरकारकडून 38 कोटी 60 लाख 84 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आलेली ही भाऊबीज भेट राज्यातील 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संकटाच्या काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचविणे तसेच माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.