ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन : संघर्षात पाकचे आठ जवान ठार
वृत्तसंस्था / श्रीनगर
दिवाळीनिमित्त देशभर आनंद साजरा केला जात असतानाच पाकिस्तानने कुरापती काढण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बारामुल्ला येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे अधिकारी सबइन्स्पेक्टर राकेश डोभाल हुतात्मा झाले. तसेच उरी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये तीन लष्करी जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानचे आठ जवान ठार झाल्याचे वृत्त ‘एनआयए’ने दिले आहे. मृतांमध्ये तीन विशेष कमांडोंचा समावेश असून अन्य दहा ते पंधरा जवान गंभीर जखमी झाल्याचे समजते.
पाकिस्तानकडून शुक्रवारी काश्मीरमध्ये तीन भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. गुरेज सेक्टरमधील इझमार्ग भागात दुपारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच कुपवाडा जिल्हय़ात गोळीबार झाला. पाकिस्तानी लष्कराने उरी सेक्टरमधील बारामुल्लाच्या दिशेने गोळीबार केला होता. या वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या गोळीबारात सहा स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कमलकोट आणि बालकूट येथे या घटना निदर्शनास आल्या. याशिवाय उत्तर काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केरन सेक्टरमध्येही पाकिस्तान मोर्टारने बॉम्बहल्ला करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
बंदिपोरा जिल्हय़ात सर्वात प्रथम शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये गोळीबार झाला. पाकिस्तान लष्कराकडून बारामुल्ला जिल्हय़ातील उरी सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कर तिन्ही ठिकाणी योग्य प्रत्युत्तर देत असल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक हुतात्मा झाले आहेत. राकेश डोवाल असे संबंधित अधिकाऱयाचे नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्मयाला मार लागला होता. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तराखंडमधील रहिवासी असून त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि 9 वर्षीय मुलगी असा परिवार आहे.
कुपवाडात इंटरनेट सेवा बंद
पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.