प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावला नाटय़-कला क्षेत्राचा देदीप्यमान वारसा लाभला आहे. त्यामुळे येथील अनेक कलाकार आज देश-विदेशात आपली वेगळी छाप उमटवीत आहेत. मूळचा बेळगावचा असणारा एक युवक सध्या ऑस्ट्रेलियात लघु चित्रपट, मालिका व जाहिरातपटांतून आपले नशीब आजमावत आहे. मागील 35 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात सुरू असणाऱया ‘नेबर्स’ या मालिकेमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बेळगावची कला आता सातासमुदापार पोहोचली आहे.
मूळचे लक्ष्मीनगर-गणेशपूर येथील विनय बाळकृष्ण माळगे इंजिनियर असल्याने कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या कुटुंबासमवेत आहेत. त्यांचा मुलगा धुव हा सध्या 11 वीमध्ये मेलबर्न शहरात शिक्षण घेत आहे. धुव याला लहानपणापासून नाटय़-कला क्षेत्राची आवड असल्यामुळे तो हळूहळू त्या क्षेत्राकडे वळला. लहान लघुपटांसाठी त्याने काम करण्यास सुरुवात केली.
द फायनल फोर ए या लघुपटातून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नेटफ्लिक्सने घेतलेल्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती. आतापर्यंत दोन जाहिरातपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. घरगुती हिंसाचारावर आधारित सरकारी जाहिरातीमध्ये त्याने काम केले आहे. सध्या नेबर्स या मालिकेमुळे त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
बेळगावचे ऋणानुबंध यापुढेही राहतील : विनय माळगे (धुवचे वडील)
धुवला चित्रपटाची आवड असल्यामुळे तो ती आवड जोपासत आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, युनायटेड किंगडम व आयर्लंड या देशांमध्ये दाखविण्यात येणाऱया नेबर्स मालिकेमध्ये तो सध्या काम करत आहे. बेळगावमधून मिळालेल्या बाळकडुमुळे सध्या तो ऑस्ट्रेलियात चमकत आहे. त्यामुळे बेळगावचे हे ऋणानुबंध यापुढेही असेच राहतील, असे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.