ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांचा 25 वर्षीय पुतण्या किम हान सोल बेपत्ता आहे. त्याला अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) सुरक्षेच्या कारणामुळे ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, सीआयए याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.
किम हान हा किम जोंगचा सावत्र भाऊ किम जोंग नाम यांचा मुलगा आहे. तोच उत्तर कोरियाचा खरा वारसदार असल्याचे सांगण्यात येते. 2017 मध्ये क्वालालंपूर विमानतळावर एका एजंटने किम जोंग नाम यांची हत्या केली होती. डॉन थी हुआंग आणि सीती आशिया या इंडोनेशियन महिलांना या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नामच्या हत्येचे आरोप हुकूमशाह किम जोंगवरही करण्यात आले होते. मात्र, जोंग यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम हानची आई आणि बहीण 2017 मध्ये अतिशय गोपनीय पद्धतीने उत्तर कोरिया सोडून गेले होते. त्यानंतर किम हान सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या एजंटसोबत शेवटचे दिसले होते.