वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जानेवारी महिन्यात होणार आहे. प्रत्येक वर्षीच्या टेनिस हंगामातील ही पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कोरोना महामारी समस्येमुळे ऑस्ट्रेलियातही प्रतिबंधक नियम कडक करण्यात आले आहेत. दरम्यान या आगामी ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी टेनिसपटूंना 14 दिवसांच्या कालावधीकरिता क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली असून क्वारंटाईनमध्ये असतानाही टेनिसपटूंना सराव करण्याची परवानगी टेनिस ऑस्ट्रेलियाने दिली आहे.
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा आयोजकांनी व्हिक्टोरिया शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर कोरोना प्रतिबंधक नियमासंदर्भात सविस्तर चर्चा केली. नव्या वर्षातील या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱया विदेशी टेनिसपटूंना ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्यांच्यासाठी क्वारंटाईनची सुविधा सक्तीची करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा 18 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे.
दरम्यान या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियातील चार शहरांमध्ये होणारी एटीपी चषक पुरुषांची टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. 24 देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा पहिल्यांच एटीपीतर्फे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन, पर्थ आणि सिडनी या शहरांमध्ये घेतली जाणार होती. ग्रँडस्लॅमच्या पूर्वतयारीसाठी होणाऱया 2021 च्या टेनिस हंगामातील एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील काही स्पर्धा मात्र घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.