बेळगाव / प्रतिनिधी
बसवाण गल्ली येथील जिजामाता महिला सहकारी बॅंकेची 47 वी सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिरामध्ये ही सभा झाली. व्यासपीठावर चेअरपर्सन अश्विनी बिडीकर, व्हा. चेअरपर्सन जयश्री भोसले, सुचेत्रा भोसले, लीला पाटील, साक्षी चोळेकर, रेश्मा जाधव, मंगल नाईक, नविता माने, लता खांडेकर, भाविका होनगेकर, शशिकला काकतकर आदी उपस्थित होत्या.
प्रारंभी उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. वैष्णवी डोंगरे यांनी ईशस्तवन सादर केले. बँकेचे विद्यमान चेअरपर्सन ऍड. अश्विनी गजानन बिडीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जिजामाता व संस्थापक कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी चेअरपर्सन अश्विनी बिडीकर प्रास्ताविक करून संस्थेच्या विकासाबद्दल माहिती देताना म्हणाल्या, समाजातील तळागाळातील मध्यमवर्गातील लोकांना बँकेमध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवून ग्राहकांसाठी नवीन सुविधा दिल्या जात आहेत.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी अहवाल वाचन केले. अंदाजपत्रकाचे वाचन स्नेहल वसुलकर यांनी केले. संस्थेकडे 2019-20 या सालात 42 कोटी ठेवी झाल्या आहेत तर 32,14,11,000 इतकी रक्कम कर्ज म्हणून वाटप करण्यात आली आहे. 24,52,18,000 रुपये बँकेची गुंतवणूक असून 55,10,984 इतका नफा झाला आहे.
याप्रसंगी बॅंकेचे संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक गजानन पाटील यांनी केले. शीतल नाकाडी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.