प्रतिनिधी/ रत्नागिरी
अंगणवाडीतील मुले, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणाऱया ठेकेदाराच्या रत्नागिरी एमआयडीसीमधील गोडावूनची ‘भाजयुमो’च्या पदाधिकाऱयांनी भांडाफोड केली होती. या प्रकरणी एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी आणि अन्न व प्रशासनाच्या अधिकाऱयांनी पोलिसांच्या उपस्थितीत बुधवारी मध्यरात्री गोडावून सील करण्याची कारवाई केली.
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमधील एका गोदामात जिह्यातील 208 अंगणवाडय़ातील 3 ते 6 वयोगातील मुले तसेच गरोदर आणि स्तनदा माता यांना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे, टोके, किडी लागलेले धान्य चांगल्या पॅकिंगमधून अन्न व औषध प्रशासनाचे नियम डावलून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नावाखाली वितरित केले जात होते. याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांना मिळाली. भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली संकेत बापट, हर्षद घोसाळकर, विक्रम जैन, बाबू सुर्वे, डॉ. ऋषिकेश केळकर यांसह भाजपा पदाधिकारी राजीव किर, नित्यानंद दळवी, डॉ. अभय धुळप, राजन फाळके, रमाकांत आयरे, प्रेम थापा यांनी त्या गोडावूनला धडक दिली.
भाजयुमोचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी धान्य प्लास्टिक पिशवीमध्ये भरण्याचे काम सुरु होते. तर मोठय़ा प्रमाणात धान्याची पोती रचून ठेवण्यात आली होती. या पोत्याना टोके व किडी लागल्याचे दिसत होते. गहू पायाखाली तुडवला जात होता. हे गोडावून सावंत पॅब्रिकेटर्सचे रुपेश सावंत (रा. सांगली) यांच्या नावावर असल्याचे चौकशीतून समोर आले. त्यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी ते माहेश्वरी महिला बचत गट, क्रांती चौक, बीड यांना दिले आहे. तोष्णीवाल नामक व्यक्ती हा ठेका चालवत आहे. हे गोडावून माहेश्वरी महिला बचत गटाच्या नावावर असले तरीही तेथे काम करणारे कामगार पुरुष होते व पिशवीत भरला जाणारा गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसले.
त्या धान्यांच्या पॅकिंगवर बॅच नंबरसह संपूर्ण तपशीलच गायब होता. काही पॅकींगवर रत्नागिरी एमआयडीसी तर काही पॅकिंगवर ज्या ठेकेदाराला काही महिन्यापूर्वी सील केले होते त्या खडपोली-चिपळूणचा पत्ता टाकण्यात आला होता. या बाबत पदाधिकाऱयांनी तेथे उपस्थित तोष्णीवाल या उपठेकेदाराच्या प्रतिनिधीची कानउघडणी केली. भाजयुमोच्या पदाधिकाऱयानी या बाबत तातडीने अधिकाऱयाना माहिती दिली. रत्नागिरीचे तहसीलदार संपर्क करूनही घटनास्थळी आले नाहीत. मात्र ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलीस कर्मचारी दाखल झाले. भाजयुमो पदाधिकाऱयांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांच्याकडे संपर्क साधला. त्यानंतर महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. व्ही. काटकर यांनी गोदामाला भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी बांभळे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धान्याची पाहणी केली. गोदाम ताब्यात घेऊन पुढील कारवाईस सुरुवात केली. संपूर्ण धान्याचा तपशील घेतल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या उपस्थितीत गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी सील केले. यावेळी भाजयुमोचे अनिकेत पटवर्धन, नंदू चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट….
ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी जिह्यातील निष्पाप मुले आणि गरोदर, स्तनदा मतांच्या जीवाशी खेळणाऱया या ठेकेदारावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील ज्या ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती, त्याचे धान्यही रत्नागिरीतूनच वितरित केले जात असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या ठेकेदाराचा ठेका अजून कायम आहे का, हा मुद्दाही पुढे येत आहे. या ठेकेदारावर कठोर कारवाईच्या मागणीने जोर धरला आहे.