अमेरिकेतील युनिव्हर्सल स्टुडिओशी फिल्म एडिटींगसाठी करारबध्द
शॉर्ट फिल्म, बॉलीवुड ते हॉलीवुड चित्रपटांचे एडिटिंगपर्यंत (फिल्म मेकींग) घेतली गरुड भरारी
कोल्हापूर / नंदकुमार तेली
अमेरिकेतील फिल्म मेकींग युनिव्हर्सल स्टुडिओशी कोल्हापुरच्या ( बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाव्दार रोड) अवघ्या 28 वर्षीय अनुज रघुनाथ जमदग्नी हा करारबध्द झाला आहे. हॉलीवुड चित्रपट क्षेत्रात एडिटिंगमध्ये त्याने स्टार कामगिरी बजावली आहे. त्याच्या फिल्म मेकींगचा छंद व एडिटिंगचे कौशल्याची दखल घेऊन लॉस एंजोलिसमधील नामांकित वॉयेज एल.ए.मॅगझिनमध्ये मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्याने स्वयंप्रेरणेणे जिद्दीच्या जोरावर जेपोस्ट ( जमदग्नी पोस्ट प्रोडक्शन) या नावाची कंपनी लाँच केली आहे. शॉर्ट फिल्म, बॉलीवुड ते हॉलीवुड अशी गरुड भरारी घेत त्याने गरुड भरारी घेतली आहे. त्याने हॉलीवुडमध्ये केलेल्या या स्टार कामगिरीमुळे कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
अद्ययावत फिल्म मेकींग प्रशिक्षण पूर्ण
फिल्म मेकींगची आवड जोपासत अनुजने सुरुवातीला पुण्यातील मल्हार या स्टुडियोत एडिटरची नोकरी केली. या अनुभवाच्या जोरावर त्याने शिष्यवृत्तीसह जगातील पहिल्या पाच युनिव्हर्सिटीपैकी एक असणाऱया लॉयला मेरी माऊंट युनिव्हर्सिटमध्ये प्रवेश मिळविला. याठिकाणी फिल्म मेकींगचे अद्ययावत 3 वर्षांचे प्रशिक्षण अवघ्या वयाच्या 28 व्या वर्षी पूर्ण केले. शिक्षणाचा खर्च लाखांत असून त्याला मामा कौस्तुभ वायंगणकर यांनी आर्थिक हातभार लावला.
हॉलीवुडमध्ये अनुजची `स्टार’ कामगिरी
लॉस ऐंजोलिस (अमेरिका-हॉलीवुड) येथील वॉयेज एल.ए. मॅगझिनने अनुजच्या एडिटिंगच्या कौशल्याची दखल घेत खास मुलाखत प्रसिध्द केल्याने तेथील चित्रपट क्षेत्रात चमकला आहे. त्याने नुकतेच जॅझ म्युजिकचे किंग कमासी वॉशिंगटन यांचा म्युझिक व्हिडिओ व एडिटिंगचे काम थेट संपर्कातून करून दिले आहे. तसेच अनुजने एडिट केलेल्या 3 शॉर्ट फिल्म मॅक्सिको फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजल्या. यामुळे परिक्षकांनी त्याच्या एडिटींग कौशल्याचे कौतुक केले आहे. युनिव्हर्सल स्टुडिओशी करारबध्द झाला आहे.
आजीकडून वाढदिवसाची कॅमेरा भेट
पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत 20 जणांचा टीम लिडर व चांगल्या पगाराची नोकरी केली. फिल्म मेकींगच्या छंदामुळे त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडली. यासाठी आई संज्योत ( टिव्ही मालिका कलाकार व सध्या घरकाम ) व वडील रघुनाथ उर्फ अमोल (व्यावसायिक) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. तर आजी अपर्णा वायंगणकर यांनी नातवाची फिल्म मेकींग (शॉर्ट फिल्म, एडिटिंग) आवड ओळखून फिल्म मेकिंग कॅमेरा भेट दिला आणि पुढे तोच छंद त्याने जोपासला.
फिल्म मेकींगच्या छंदासह शिक्षण, खेळाचीही आवड
केआयटीमध्ये त्याने अनेक शॉर्ट फिल्मचे एडिटिंग केले. याची दखल घेत त्याला बेस्ट डायरेक्टर ( अप कमिंग ) ऑफ कोल्हापूर पुरस्काराही मिळाला. तर एडिटिंगसाठी अनेक अॅवॉर्ड मिळविले आहेत. तसेच अनुजचे शालेय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण न्यू मॉडेल तर बीई ( कॉम्प्युटर इंजिनिअरींग ) केआयटीमध्ये झाले. कॉलेजच्या काळात त्याने प्राईड ऑफ केआयटीसह बेस्ट स्टुडंट (2014) चा पुरस्कार पटकविला होता. शिक्षणाबरोबरच त्याला क्रिकेट, बुद्धीबळ खेळाची आवड आहे. सध्या तो हॉलीवुड क्रिकेट क्लबमधून खेळत असून अध्यात्मासह कविता करण्याचाही छंद त्याने जोपासला आहे.