वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण होऊन रस्ता वाहतुकीला सुरळीत झाल्यामुळे नागरिकांतून व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून 40 लाख रुपये मंजूर झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच यापूर्वी चव्हाटा सर्कल ते पोतदार कॉलनीपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठीही 50 लाख रुपये मंजूर झाले होते. काँक्रिटीकरण रस्ता कामाचेही काम गेल्या महिन्यापूर्वी पूर्ण झाले असून सदर दोन्ही रस्त्यांचे काम पूर्ण होऊन दोन्ही रस्ते वाहतुकीला सुरळीत झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
‘तरुण भारत’मधून वारंवार पाठपुरावा
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर व चव्हाटा सर्कल ते पोतदार कॉलनीपर्यंतचे हे दोन्ही रस्ते उखडून खड्डे पडल्यामुळे दुचाकी, चारचाकी व इतर वाहनधारकांना प्रवास करतेवेळी तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत होती. याचा पाठपुरावा ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून वारंवार करण्यात येत होता. शेवटी प्रशासनाने ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल घेऊन दोन्ही रस्ते पूर्ण करून वाहतुकीला सुरळीत केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.