महसूल संचालनालयाच्या पथकाने केली कारवाई : दुबईहून आणले होते सोने, दोघा कर्नाटकी प्रवाशांना अटक
प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळावरून 50 लाखांच्या सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न असफल करण्यास महसूल संचालनालयाच्या पथकाला यश आले. या पथकाने सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा हवाई प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 किलो सोने हस्तगत केले. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
महसूल संचालनालयाच्या पथकाला दाबोळी विमानतळावरून सोन्याची तस्करी होणार असल्याचा सुगावा लागला होता. त्यामुळे त्यांनी विमानतळावर उतरणाऱया प्रवाशांवर पाळत ठेवली होती.
या पथकातील अधिकाऱयांना दोघा प्रवाशांबद्दल संशय आल्याने त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली असता, सोन्याच्या तस्करीचे बिंग फुटले. असगर अली व मोहम्मद समान अशी या प्रवाशांची नावे असून ते दोघेही कर्नाटकातील रहिवासी आहेत. या दोघाही प्रवाशांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 1 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 50 लाख रूपये आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 लाखांच्या सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणारे असगर अली व मोहम्मद समान हे दोघेही इंडिगो एअरलाईन्स (68445) च्या विमानाने बुधवारी सकाळी दुबईहून गोव्यात उतरले होते. कुणाला काहीही कळायच्या आत हे सोने घेऊन विमानतळाच्या बाहेर निसटण्याच्या प्रयत्नात असतानाच ते महसूल संचालनालयाच्या अधिकाऱयांच्या तावडीत सापडले.
सोन्याच्या पावडरची कॅप्सूल्स लपविली अंतर्वस्त्रात
अटक केलेल्यांकडे सापडलेले तस्करीचे एक किलो सोने पावडरच्या स्वरूपात होते. ही सोन्याची पावडर त्यांनी अनेक कॅप्सुलमध्ये बंद केली होती. एका प्रवाशाने 4 कॅप्सुल आपल्या अंतर्वस्त्रात लपवले होते तर दुसऱया प्रवाशाने सोन्याच्या पावडरने भरलेले 3 कॅप्सुल आपल्या शरीरात लपवले होते. महसूल संचालनालयाचे अधिकारी या तस्करीचा अधिक तपास करीत आहेत.