पेठ वडगाव / प्रतिनिधी
पेठ वडगाव येथील सहारा चौक येथील गट नंबर १५६/६ मध्ये झालेल्या अतिक्रमण, घाणीच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी रहिवासी असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात डेंग्यू, मलेरिया, हिवताप आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या ठिकाणी झालेले अतिक्रमण काढून घ्यावे व घाणीचे साम्राज्य दूर करावे अशी मागणी येथील नागरिकांनी पालिकेकडे वारंवार केली आहे. मात्र याकडे मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत २६ जानेवारी रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिक दत्तात्रय नाना माने यांनी मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांचेकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
पालिकेच्या मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ वडगाव येथील सहारा चौक येथे मिळकत क्रमांक १५६ मध्ये दत्तात्रय माने हे रहिवासी आहेत. या मिळकती मधून वडगाव पालिकेने वडगाव शहर सुधार विकास आराखड्यानुसार रस्ते व गटारी केल्या आहेत. कच्या स्वरूपाचे रस्ते व कच्च्या स्वरूपाच्या गटारी केल्या आहेत. म्हणजे पालिकेची मालकी या ठिकाणी असल्याचे सिद्ध होते मात्र या ठिकाणी कै नारीकांनी अतिक्रण करून गटारीतून वाहणारे सांडपाणी कचरा टाकून जाळी लावून तसेच दगड लावून तुंबविले जात आहे. त्यामुळे या वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात घाणीच्या साम्राराज्यामुळे डास, माशांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे येथे चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप व अन्य आजार वाढत आहे.
पालिकेचा रस्ता पंधरा फुटाचा असताना मात्र प्रत्यक्षात पाच फुट रस्ता रहदारीस दिसत आहे. यामुळे या ठिकाणी वस्तीमध्ये रुग्णवाहिका, अग्निशामक, कचरागाडी ही वाहने पोहोचू शकत नाहीत. पालिकेच्या मालकीचा रस्ता असताना या रस्त्यात मोठे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना वेळोवेळी लेखी तक्रार दिली आहे. गेल्या तीन वर्षापासून वारंवार पालिकेकडे येथील रहिवाशी यांच्या सह्या घेवून पालिका प्रशासनास निवेदने दिली आहेत. मात्र मुख्याधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामचुकारपणा करणार्या पालिकेच्या अधिकार्यावर सेवा हमी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
येत्या २६ जानेवारी पर्यत या मागणीची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी पालिका चौकातआत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवासी दत्तात्रय माने यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनात होणार्या जीवित नुकसानीस वडगाव पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पालिका अभियंता बळवंत बोरे, तांबोळी, आरोग्य अधिकारी गोडेकर, स्वच्छता निरीक्षक उदयकुमार डोंगरे हे जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.