रशियाने स्वतःच्या लसीची भारतात निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे. 2021 पासून भारतात दरवर्षी सुमारे 30 कोटी डोस निर्माण करण्यात येणार असल्याचेही रशियाने म्हटले आहे. रशियाने याकरता भारताच्या 4 प्रमुख लसउत्पादक कंपन्यांशी चर्चा केली आहे. लसीच्या यशाच्या घोषणेवेळीच रशियाने लसीची निर्मिती भारतात करणार असल्याचे म्हटले होते.
91 टक्क्यांहून अधिक प्रभावी
स्पुतनिक-5 ही लस विषाणूच्या विरोधात 91.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाच्या कंपनीने केला होता. लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या डाटाचे तीन फायनल कंट्रोल पॉइंट ऍनालिसिस केल्यावर हा निष्कर्ष प्राप्त झाला आहे. पहिल्या कंट्रोल पॉइंटमध्ये लसीचा 92 टक्के प्रभाव दिसला, तर दुसऱया कंट्रोल पॉइंटमध्ये हा आकडा 91.4 टक्के राहिल्याचा कंपनीचा दावा आहे.
100 टक्के उपयुक्त
लसीने कोरोनाच्या गंभीर प्रकरणांच्या विरोधात 100 टक्के प्रभावोत्पादकता दाखविल्याचा दावा गामलेया रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने केला आहे. लसीच्या वैद्यकीय परीक्षणाचा विदा लवकरच प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये स्पुतनिक-5 लसीच्या त्वरित नोंदणीसाठी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
लसीचे कार्यस्वरुप
रशियाची लस एडिनोविषाणूवर आधारित आहे. ही लस कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमध्ये आढळून येणाऱया स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल ही लस करत असल्याने शरीरात इम्यून प्रतिसाद निर्माण होतो. सेशेनॉव विद्यापीठात लसीचे वैद्यकीय परीक्षण सुरू झाले होते.
भारतीय कंपन्यांशी बोलणी
2021 मध्ये भारत रशियाच्या लसीचे सुमारे 30 कोटी डोस तयार करणार आहे. भारताच्या 4 प्रमुख कंपन्यांशी संपर्क साधला आहे. भारत 30 कोटी किंवा त्याहून अधिक लसीचे डोसही निर्माण करू शकतो असे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी म्हटले आहे.