वार्ताहर / कुंभोज
बाहुबलीमध्ये दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गुरुदेव समंतभद्रजी महाराज यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुदेव श्री समंतभद्र महाराजांनी शील, ज्ञान, प्रेम, सेवा आणि व्यवस्था या गुरुकुल पंचसूत्रीचा अविष्कार करून जागोजागी गुरुकुल युक्त शिक्षण प्रणालीस प्राधान्य दिले. गुरुदेवांच्या छत्रछायेखाली प्रस्थापित महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश मध्ये एकूण अकरा गुरूकुल आणि सहा प्राथमिक, 12 माध्यमिक, पाच उच्च माध्यमिक शाळांची स्थापना झाली आहे. सध्या अकरा हजाराहून अधिक विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुरूदेवांचा जन्मदिवस घरगुती स्वरूपात साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सामुदायिक कार्यक्रम घेण्याचे टाळाण्याचे धोरण संस्थेने ठरवले आहे. त्यामुळे यावर्षी गुरुदेवांचा जन्मदिन सार्वजनिक पद्धतीने साजरा केला नाही व त्यानिमित्ताने कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ या संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ठरवले होते.
घरगुती स्वरूपात प.पू. गुरुदेव श्री समंतभद्र महाराज यांची १२९ वी जयंती संपन्न झाली. यावेळी आचार्य श्री धर्मानंदसागर महाराज व आर्यिका श्री ज्ञानमती माताजी यांचे सानिध्यात सकाळी ७.३० वा. चरणाभिषेक व अष्टक तर ८.१५ वा. इष्टोपदेश पठन व बाहुबली दिनदर्शिका प्रकाशन असे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित झाले. प्रत्यक्ष उपस्थित न राहता श्रावक व श्राविकांनी Kumbhoj Bahubali YouTube channel द्वारे ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या वेळी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ चे महामंत्री डी. सी. पाटील, संचालक बी.टी.बेडगे गुरूजी, वितराग दोशी, बा. ब्र. सुजाता रोटे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, तात्यासाहेब अथणे, उपमुख्याध्यापक सुभाष साजणे तसेच अध्यापक अध्यापिका उपस्थित होते.