केंद्रीय आरोग्य विभागची माहिती, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना माहिती द्यावी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अधिक वेगाने प्रसार होणारा, नव्या रूपातील कोरोना अद्याप भारतात आढळलेला नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य विभागाने केले आहे. मात्र सतर्कता आवश्यक असून नियमांचे पालन करण्यात कोणीही ढिलाई दाखवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. नव्या कोरोनाचा प्रसार सध्याच्या कोरोनापेक्षा चाळीस पट अधिक वेगाने होत असल्याचे आढळले आहे.
नव्या कोरोनाचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये सर्वाधिक असल्याने त्या देशाहून येणाऱया सर्व प्रवासी विमानांना भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ही बंदी सुरू होण्यापूर्वी अनेक प्रवासी पोहचले असून त्यांच्यासाठी विलगीकरण आदेश काढण्यात आला आहे. अशा प्रवाशांचा शोध घेण्यात येत असून त्यांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेंगळूर, कोलकता आणि दिल्ली विमानतळांवर आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या 17 प्रवाशांना थांबविण्यात आले असून त्यातील 9 जण बाधित असल्याचे आढळले आहे. त्यांची तपासणी सुरू असून त्यांचा कोरोना कोणत्या प्रकारचा आहे, हे शोधले जात असल्याचे सांगण्यात आले.
प्रवासाची माहिती देणे अनिवार्य
परदेशातून (कोणत्याही देशातून) भारतात येणाऱया प्रत्येकाने त्याच्या गेल्या 14 दिवसांच्या प्रवासांची माहिती कागदपत्रांच्या आधारासह देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सूचना प्रत्येक विमानतळांना देण्यात आली आहे. त्यामुळे विदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला ही माहिती विमानतळावरच द्यावी लागणार आहे. तसेच त्याची तेथेच तपासणीही होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
उपचाराधीन रूग्ण 3 लाखांपेक्षा कमी
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत उपचाराधीन रूग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 518 इतकी आहे. ही गेल्या 173 दिवसांमधील (जवळपास साडेपाच महिने) सर्वात कमी संख्या आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या काळात देशभरात 19 हजार 556 नवे रूग्ण आढळले असून हीसुद्धा गेल्या पाच महिन्यांमधील सर्वात कमी संख्या असल्याची माहिती देण्यात आली. बरे होण्याचे प्रमाण आता 95.65 टक्के इतके असून कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण 1.45 टक्के आहे. या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2 हजार 834 व त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 1,515 रूग्ण आढळले आहेत.